suicide

धक्कादायक : मोबाइल घेण्यास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्र

दोन महागडे मोबाइल असूनही आणखी एक मोबाइल खरेदी करण्यासाठी आईने नकार दिल्याने रागाच्या भरात एका तरूणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री जळगावात घडली. सुमेध काकासाहेब भालेराव (वय २३, रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी मृतदेहाची ओळख पटली.
त्याच्या जवळ आधीपासूनच दोन मोबाइल होते. तरीही त्याने आईजवळ आणखी एक मोबाइलचा हट्ट धरला होता. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर तो रागातच दुचाकीने घराबाहेर पडला. रात्री ११ वाजता दुचाकी शिव कॉलनी पुलाजवळील रेल्वे रुळांसमोर उभी करून त्याने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली.
तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती रेल्वेच्या लोको पायलटने रेल्वे अधिकाऱ्यांना कळवली होती. त्यानंतर पोलिसांनी छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह रुग्णालयात आणला होता. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सुमेधची दुचाकी रेल्वे रुळांशेजारी असलेल्या रस्त्यावर उभी असल्याचे दिसून आली. या दुचाकीच्या क्रमांकावरून माहिती मिळवली. मंगळवारी सकाळी सुमेधच्या मित्रांनी मृतदेहाची ओळख पटवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *