nilesh-rane-malvan

“राणेंना” कार्यालयात येण्यास भाग पाडू नका – माजी खासदार निलेश राणेंचा मत्स्यव्यवसायला इशारा ,’ भ्रष्ट अधिकारी प्रदीप वस्तला कोणत्याही परिस्थितीत हटवणार’

कोकण देश महाराष्ट्र मुंबई राजकीय

मालवण : मत्स्यव्यवसाय विभागाच्या हातावर तुरी देऊन निसटलेल्या मलपी येथील ट्रॉलरला पळविण्यात हात असलेल्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रदीप वस्त या अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी पारंपरिक मच्छीमारांनी मंगळवारी माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन मत्स्यव्यवसाय विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईसाठी शासनाला भाग पाडणार असून आमदार नितेश राणे यांच्यामार्फत याप्रकरणी विधिमंडळाच्या अधिवेशनात दाद मागण्यात येईल, असे निलेश राणे म्हणाले.
सिंधुदुर्गात सध्या परराज्यातील हायस्पीड आणि पर्सनेट ट्रॉलर्सचे अतीक्रमण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने सिंधुदुर्गात मासेमारी करताना मलपी येथील ट्रॉलरला ताब्यात घेऊन मालवणच्या बंदरात आणले होते, मात्र त्याच रात्री हा ट्रॉलर मत्स्यव्यवसायच्या ताब्यातून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सदरील बाब निदर्शनास आली होती. या संपूर्ण प्रकरणात संबधित गस्तीनौकेवरील मत्स्यव्यवसाय विभागाचा अधिकरी प्रदीप वस्त हा संशयाच्या जाळ्यात अडकला होता. या ट्रॉलरच्या पलायन नाट्यांनंतर तब्बल दीड दिवस प्रदीप वस्त हे कार्यालयास कोणतीही कल्पना न देता गायब होते. त्यामुळे मनसे नेते परशुराम उपरकर यांच्यासह मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मच्छीमारांसह मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालवण कार्यालयात धडक देत य प्रकरणी जाब विचारला. यावेळी प्रदीप वस्त यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली होती. त्यानुसार सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी प्रदीप वस्त यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवला होता. मात्र या घटनेस आठवडा उलटूनही वस्त यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी अशोक सावंत, मंदार केणी, सुदेश आचरेकर, बाबा परब, महेश जावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय विभाग प्रदीप वस्त याला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. प्रदीप वस्त याने ट्रॉलर पळून गेल्याची पहिली माहिती खात्याला देण्यापूर्वी शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाला का दिली ? असा सवाल करून या प्रकरणात सर्वच ठिकाणी संशयाचे ढग निर्माण झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
यावेळी प्रदीप वस्त याला वाचविण्याचे कितीही प्रयत्न केले तरी चालू अधिवेशनात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून प्रदीप वस्त याची मालवणातून बदली केल्याशिवाय राहणार नाही, असे निलेश राणे म्हणाले. मात्र राणेकुटुंब मच्छिमारांसाठी सर्व काही करत असताना आपण काय करतो ? याचे आत्मपरीक्षण मच्छीमारांनी करावे असे, निलेश राणे म्हणाले.
स्थानिकांच्या सहकार्याशिवाय हा ट्रॉलर बंदरातून बाहेर जाऊ शकत नाही. असे  सांगून अनधिकृत मासेमारी बाबत मत्स्यव्यवसाय विभागाने वेळीच योग्य ती कारवाई करावी , “राणेंना” कार्यालयात येण्यास भाग पाडू नका असा सूचक इशाराही निलेश राणे यांनी दिला. मच्छीमारांच्या शिष्टमंडळात छोटू सावजी, दिलीप घारे, संतोष देसाई, भाऊ मोर्जे, लिओ काळसेकर, वसंत गावकर, चैतन्य तारी, संजय जामसांडेकर, दिवाकर देऊलकर यांच्यासह अन्य मच्छीमारांचा समावेश होता.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *