LALAN-SARANG

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री लालन सारंग यांचे पहाटे निधन

कोकण महाराष्ट्र मुंबई

मुंबई : ज्येष्ठ  मराठी अभिनेत्री लालन सारंग यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. लालन यांनी मराठी रंगभूमीच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमीवरील ‘बंडखोर’ अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जायच्या. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी रंगभूमीवर ५ दशकांचा काळ गाजवला. ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मोरूची मावशी’, ‘उद्याचा संसार’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. लालन सारंग यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात झाला. ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘अत्रे थिएटर्स’च्या नाटकांमधून अभिनय प्रवासाला त्यांनी सुरुवात केली.

‘नाटकांमागील नाटय़’, ‘मी आणि माझ्या भूमिका’, ‘जगले जशी’, ‘बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती’ आदि पुस्तकेदेखील त्यांनी लिहीली. कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *