ATM

भिवंडीत एटीएम फोडून तब्बल ‘१८ लाख’ केले गायब

कोकण महाराष्ट्र मुंबई

भिवंडी : भिवंडी शहरातील अंजूरफाटा, शिवाजी नगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम दहा दिवसांपूर्वीच चोरटय़ांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील सुमारे १० लाख रुपये लुटल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवारी पहाटे कोनगांव येथील अजित पेट्रोल पंपालगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून चोरटय़ांनी १७ लाख ६९ हजार ५०० रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली आहे.

भिवंडीत एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने बँक व्यवस्थापनांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, लुटारूंच्या अटकेचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. भिवंडी-कल्याण रोडवरील कोनगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम असून चोरटय़ांनी या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमे-यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून येथील एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यामधील १७ लाख ६९ हजार ५०० रुपयांची रोकड लुटून पोबारा केला आहे.

एटीएम मशीनवर एक ग्राहक पैसे काढण्यासाठी आला असता, ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर या चोरीची माहिती स्थानिक कोनगांव पोलीस ठाण्यास कळवल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर, उपनिरीक्षक पवन नांद्रे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

सदरचे एटीएम मशीन स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे असून एटीएम कंपनीचे कर्मचारी सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी या चोरीबाबत कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भिवंडीतील अंजूरफाटा, शिवाजी नगर येथील बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम लुटारूंनी २७ ऑक्टोबरच्या पहाटे फोडून त्यातील सुमारे १० लाखांची रोकड लुटून नेली आहे. अशाच प्रकारे लुटारूंनी कोनगांव येथील एटीएम फोडण्यासाठी शक्कल लावून १८ लाखांची रोकड लुटली आहे.

एटीएम फोडण्याचे प्रकार रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले असून, डिटेक्ट किंग म्हणून ओळख असलेल्या उपनिरीक्षक पवन नांद्रे यांनी नुकताच कुरिअरची रोकड लुटल्याचा गुन्हा उघड केला असून, एटीएम लुटीचे गुन्हे देखील लवकरच त्यांच्या तपास पथकाकडून उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *