best-buses

परिवहन विभागाच्या ‘बेस्टचे’ अस्तित्वच धोक्यात?

कोकण महाराष्ट्र मुंबई

मुंबई :  सध्या आर्थिक कोंडीत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच आहे. कधी कर्ज देण्यास बँकांचा नकार, तर कर्जाची परतफेड न केल्याने बेस्टची बँक खातीच सील केली, इतकी नामुष्की उपक्रमावर ओढावली. याला सर्वस्वी बेस्ट उपक्रमातील सत्ताधारी, विरोधक याचबरोबर प्रशासनही तितकेच जबाबदार आहे. कर्ज देण्यास बँकांचा नकार, तर बँक खाती सील होणे आणि प्रशासन, सत्ताधारी व विरोधक या तिघांच्या शीतयुद्धामुळेच बेस्ट उपक्रमाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

खासगी वाहने, शेअर रिक्षा-टॅक्सी,, मेट्रो यामुळे बेस्ट परिवहन विभागाला आधीच स्पर्धक निर्माण झाले आहेत. भविष्यात मोनोरेलचे जाळे मुंबईभर पसरल्यास परिवहन विभागावर परिणाम होणार यात दुमत नाही. त्यातच बेस्टच्या माध्यमातून खासगी बससेवा प्रवाशांच्या नावाखाली सुरू केल्यास बेस्टचे लवकरच खासगीकरण होणार आणि हळुवार बेस्ट परिवहन विभागाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.

बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात सध्या ३,३३७ बसेस आहेत, तर दररोज यातून २३ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या माध्यमातून बेस्टच्या तिजोरीत रोज २ कोटी ६५ हजार रुपयांचा महसूल जमा होतो. तर दहा वर्षापूर्वी बेस्टच्या ताफ्यात पाच हजार बसेस होत्या आणि ४५ लाख प्रवाशांच्या माध्यमातून रोज ४ कोटी रुपये महसूल जमा होत असे.

परिवहन विभागाला लागलेली उतरती कळा, याचा विचार प्रशासन व बेस्ट उपक्रमातील सत्ताधारी पक्षाने यापूर्वीच करणे गरजेचे होते. मात्र, तेरी भी चूप मेरी भी चूप या म्हणीप्रमाणे सर्वानीच दुर्लक्ष केले आणि परिवहन विभागाच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाला असून, याला प्रशासन व सत्ताधारी जबाबदार आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *