Rohit-Sharma-batting

‘रोहितची बॅट पुन्हा तळपली’ :भारताची मालिकेत विजयी आघाडी

क्रीडा देश

लखनौ : कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपली आणि भारताने दुस-या टी-२० लढतीमध्ये मंगळवारी वेस्ट इंडिजवर ७१ धावांनी मात केली. सलग दुस-या विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
भारताचे १९६ धावांचे आव्हान वेस्ट इंडिजला पेलवले नाही. त्यांचा डाव त्यांना २० षटकांत ९ बाद १२४ धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांच्या अचूक मा-यासमोर पाहुणे फलंदाज पुन्हा ढेपाळले. त्यांच्यातर्फे सर्वाधिक २३ धावा डॅरेन ब्राव्होच्या आहेत. यजमानांतर्फे डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादव याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माच्या फटकेबाजीमुळे भारताला दोनशेच्या घरात झेप घेता आली. त्याने शिखर धवनसह अवघ्या १४ षटकांत १२३ धावांची सलामी देत मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी केली. डावखु-या धवनने ४१ चेंडूंत ४३ धावा केल्या. रोहितने एक बाजू लावून धरताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ३८ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. रोहितची फटकेबाजी पाहता १३व्या षटकात भारताचे शतक तसेच १८व्या षटकात दीडशतक फलकावर लागले.

वनडे मालिकेत तुफानी फलंदाजी करणा-या रोहितने ५८ चेंडूंमध्ये चौथे शतक पूर्ण केले. तो १११ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या ६१ चेंडूंतील खेळीमध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. रोहितच्या फटकेबाजीसमोर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी मान टाकली. रोहितच्या शतकी खेळीमुळे भारताने निर्धारित २० षटकांत २ बाद १९५ धावांची मजल मारली. त्याचे टी-२० प्रकारातील चौथे शतक आहे.

इकाना स्टेडियमचे नामकरण
लखनौ येथील इकाना स्टेडियमचे अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्टेडियम असे नामकरण करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्टेडियमचे नामकरण केले.

गावस्कर, मांजरेकर थोडक्यात बचावले
माजी महान क्रिकेटपटू, समालोचक सुनील गावस्कर आणि त्यांचे सहकारी, समालोचक संजय मांजरेकर इकाना स्टेडियमवर थोडक्यात बचावले. गावस्कर आणि मांजरेकर यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवेश केल्यानंतर जवळच असलेला काचेचा दरवाजा अचानक कोसळला. दोघांना कुठलीही दुखापत झाली नाही.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *