raj-thackeray

वाघिणीला मारण्याऐवजी बेशुद्ध करायला हवं होतं !अवनी मृत्यूप्रकरणी ‘राज’ गर्जना,

महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : गेले काही दिवस गाजत असलेले ‘अवनी’ वाघिनेच्या प्रकरणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेतला .‘‘अवनी वाघिणीला मारण्यापेक्षा बेशुद्ध करायला हवं होतं, वाघ किंवा इतर वन्यप्राण्यांची जात दुर्मिळ होत चालली आहे, अवनीला मारून तिच्या दोन बछड्यांना अनाथ केलं आहे’’ असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघिण मृत्यू प्रकरणी भाष्य केले आहे.  ‘‘वनमंत्री असले की जंगलातलं सगळं कळतंच असं नाही, केवळ पुतळे बांधून वन्यप्राण्यांचे संवर्धन होत नाही, मुनगंटीवार बेफिकीरपणे उत्तरे देतात, उद्या त्यांचे मंत्रीपद जाऊ शकते’’ असे म्हणत राज यांनी सरकारच्या मनमानी कारभारावर टीका केली आहे.

राज यांनी बुधवारी कृष्णकुंज निवासस्थानी दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अवनी वाघिणीच्या मुत्यूबाबत त्यांचे म्हणणे मांडले. ‘‘मला या गोष्टीत राजकारण आणायचे नाही. वाघ हा वन्यप्राणी अत्यंत दुर्मिळ होत चालला आहे. वन्यप्राणी असलेल्या मानवी वस्ती परिसरात अशा घटना घडतच असतात. वन्यप्राणी यांचे संवर्धन करत मानवाला कसे वाचण्यात येईल याबाबत सरकारने नियोजन करायला हवे. वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करत नसून माणूसच त्यांच्या घरात शिरकाव करत आहे’’ असे राज म्हणाले. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट्यांचा वावर आहे. असे असताना या भागात अनधिकृत नवीन इमारती-झोपडपटट्यांचे बांधकाम का होत आहे? असा सवालही राज यांनी उपस्थित केला. ‘‘गुजरातमध्ये एखाद्या सिंहाच्या बाबतीत असे काही घडले असते, तर केवढा मोठा गदारोळ केला असता’’ असे म्हणत अवनीच्या मृत्यूवरून होत असलेले राजकारण पाहता राज यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदींवरही निशाणा साधला.
………..
अनिल अंबानीला देश विकायला काढला आहे का?
यवतमाळमधील ज्या भागात अवनीला मारण्यात आले त्या भागात अनिल अंबानींचा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यामुळे तिला मारण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राज यांना विचारले असता, ‘‘ सरकारला सत्तेचा माज आला आहे. अंबांनीच्या प्रकल्पांसाठी संपूर्ण देश विकायला काढला आहे का’’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *