nilesh1

ठाणे महानगर पालिका बनली आहे बिल्डरांच्या सेटींगचा अड्डा:मा.खासदार निलेश राणे

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

ठाणे : ठाणे महानगर पालिकेमध्ये बिल्डरांच्या फायद्यासाठी आरक्षणे बदलण्याचा धंदा सुरु करण्यात आलेला आहे. आम्ही आयुक्तांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता आयुक्त काय कारवाई करतात, ते आम्ही बघतो. मात्र कारवाई झाली नाही, तर स्वाभिमान स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिला. सध्या ठाणे महानगर पालिका सेटींगबाजांचा अड्डा झालेला आहे. सर्वच राजकीय पक्ष हे या सेटींगमध्ये गुंतलेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

निलेश राणे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन थिम पार्क घोटाळ्याची चौकशी करावी, मॉडेल मिल येथील स्मशान भूमी आरक्षण उठवून तेथे नाटय़गृह बांधण्याचा प्रस्तावाची चौकशी करावी आणि ठाणे नवीन रेल्वे स्टेशन होत असलेल्या जागेत राहत असलेल्या झोपड्पट्टीवासियांचे त्या परिसरातच पुनर्वसन व्हावे, या मागण्यांचे निवेदन दिले. या नंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

 

 

थीम पार्कही स्वत:च्या फायद्यासाठी

सन २०१३ मध्ये मनोज शिंदे यांनी मॉडेल मिल नाका येथे स्मशानभूमी उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव मंजूर झालेला असतानाही आता त्या भूखंडावरील आरक्षण बदलून तेथे नाटय़गृह किंवा संशोधन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यात आलेला आहे. बिल्डरांच्या फायद्यासाठी हे आरक्षण बदलण्यात आलेले आहे. थिम पार्कचे काम चुकीच्या पद्धतीने झालेले असतानाही ठेकेदाराला पैसे देण्यात आलेले आहेत. हा प्रकार काय आहे? नितीन देसाई यांनी उभारलेले थीम पार्कही असेच स्वत:च्या फायद्यासाठी उभारण्यात आलेले आहे. या प्रकरणात १०० टक्के भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे आयुक्तांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आपण केली आहे. जर आयुक्तांनी कारवाई केली नाही तर आपण रस्त्यावरचे आंदोलन तर उभारुच शिवाय न्यायालयातही दाद मागू, असे ते म्हणाले.

सेटींगनेच ठाण्याची वाट लावली

ठाणे पालिकेमध्ये सर्वच पातळ्यांवर बिल्डरांचा फायदा केला जात आहे. सर्व कारभार सेटींगचाच आहे. सत्ता आपली, पालकमंत्री आपला म्हणून येथे मनमानी सुरु आहे. इतर राजकीय पक्षही त्यामध्ये सामील आहेत. या सेटींगनेच ठाण्याची वाट लावली आहे, असेही निलेश राणे म्हणाले.

अन्यथा,समुद्रात संघर्ष

सिंधुदुर्गातील मासेमारीच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. गोव्यातील मच्छिमार कोकणात येऊन माससेमारी करीत आहेत. एलईडी आणि पर्ससीन पद्धतीची ही मासेमारी आहे. त्यामुळे सिंधुदुगार्तील ९०० मच्छिमार कुटुंबियांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. आता हे सहन केले जाणार नाही. गोव्यातील सत्ताधाऱ्यांकडे पैसा असल्यामुळे ते हा डाव रचत असतील तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल. गोवा सरकारने माणूसकीचा धर्म पाळला पाहिजे. अन्यथा,समुद्रात संघर्ष उफाळून येईल. आता आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, अशा धमक्यांना राणे कुटुंबिय घाबरत नाही. सिंधुदुर्गचे पालकमंत्री हे पोकळ असल्याने गोव्याचे फावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आमचे हॉटेल अधिकृत

राणेंचे गोव्यात हॉटेल असल्याचे यावेळी पत्रकारांनी विचारले असता, गोव्याचे मच्छिमार हे अनधिकृतपणे मासेमारी करीत आहेत. पण, आमचे हॉटेल १५ वर्षांपासून अधिकृत आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठा मोर्चा ज्या दिशेला जाईल, त्या दिशेला आपणही

राम मंदिराच्या मुद्यावर ते म्हणाले की,बाळासाहेबांचे स्मारक ज्यांना बांधायला जमले नाही, त्यांनी राम मंदिर बांधण्याची भाषा करु नये. विटा नेऊन ठेवणार कुठे? आधी संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ सेटींग केली आहे. त्यानंतरच हे उत्तर प्रदेशात जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा निर्णय १५ नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. पण, मराठा मोर्चा ज्या दिशेला जाईल, त्या दिशेला आपणही जाणार आहोत, असे त्यांनी नमूद केले. तर, प्रकाश आंबेडकर हे समाजा-समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *