draught

तासगाव तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत तरीही पाण्याचा प्रश्न सुटेना ,तहसीलदार हि नाही जाग्याला

कोकण महाराष्ट्र

तासगाव : राज्य सरकारने ३१ ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर केला आहे. त्यापैकी तासगाव तालुक्यामध्ये गंभीर स्वरुपाच्या दुष्काळाची स्थिती आहे. सरकारने हा दुष्काळ जाहीर करून सोपस्कार पार पाडले असले तरी शेतक-यांना मदत कधी मिळणार? हाही प्रश्न आहे. तासगाव तालुक्यात नव्याने रुजू झालेले तहसिलदार दिपक वजाळे रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी नायब तहसिलदार काम पाहत आहेत. पण नायब तहसिलदार सुनिल ढाले यांच्याकड़े दुष्काळाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. त्यातच नायब तहसिलदार शासकीय कामासाठी मिरज व सांगली भागात फिरत आहेत. तहसिलदार दिपक वजाळे यांच्या केबिनला कडी आणि नायब तहसिलदार यांची खुर्ची रिकामी असल्यामुळे दुष्काळाबाबत कोणत्याही हालचाली प्रशासनाकडून होत नाहीत. त्यामुळे तासगाव तालुक्यातील शेतकरी ‘कुणी तहसिलदार देता का तहसिलदार!, अशा आर्त हाक मारत आहेत.

जनावरांच्या चा-याची सोय करण्यातच शेतक-यांचा दिवस जात आहे. तर पाण्याबाबतही परवड सुरू झाली आहे. त्यातच तालुक्याचा दुष्काळात समावेश असल्याने काही सिंचन योजना चालु आहेत, पण एका गावात कमी पाणी पट्टी तर दुस-या गावात जास्त पाणीपट्टी घेत आहेत. मात्र शासनस्तरावरुन कोणतीही हालचाल होत नसल्याने शेतक-यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

तासगाव तालुक्यात नोव्हेंवरच्या पहिल्या आठवड्यातच दुष्काळी स्थिती भयानक बनली आहे. शेतक-यांच्या पदरी खरीप हंगाम पडला नाही तोच ६० टक्के पेक्षा जास्त द्राक्षबागाही अवकाळी पावसाने, रोगाने आणि पाण्याअभावी वाया गेल्या आहेत. खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे चा-याचा प्रश्न भेडसावत आहे. पावसाअभावी विहिरींनी तळ गाठला आहे. मोटारीने पाणी काढावे एवढेही पाणी विहिरीच्या तळाशी नाही, अशी अनेक गावांत स्थिती आहे. चारा विकत घ्यावा तर त्यालाही हजारो रुपये मोजावे लागत आहेत. जनावरांच्या चारा आणि पाण्याची सोय करण्यातच शेतक-यांचा दिवस खर्ची पडत आहे. तासगाव तालुक्यातील सर्वच गावात भीषण स्थिती निर्माण होणार आहे. तर दुष्काळामुळे सावळज मणेराजुरी तासगाव येथील बाजारपेठेवर परिणाम दिसून येत आहे.

आरंरं…आबांच्या गावातही पाणी नाही!

आमदार सुमनवहिनी आर. पाटील यांच्या अंजनी गावातच पिण्याचे पाणी नाही. यावर सरकारकडून कोणतेही ठोस पावले उचलली जात नाहीत. स्व. आर. आर. आबा असते तर अधिका-यांसहित मंत्र्यांची कपडे फाडली असती. आबा असते तर आज फोंड्यामाळावर पाणी खळखळून वाहिले असते, असे संतप्त गावकरी बोलुन दाखवत आहेत.

१९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ

वयोवृद्ध शेतक-यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर त्यांनी १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ यावर्षी पडला आहे पण तहसिलदार कार्यालय ते मंत्रालयापर्यंत कोणीही दुष्काळाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

दुष्काळाबाबत आवाज उठवणारे पक्ष व संघटना गप्प का?

शिवसेना, शेकाप, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष तर कोमात गेले आहे. तसेच पत्रकबाज नेते या सर्वांना तासगाव तालुक्यातील दुष्काळ दिसेना झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटू लागल्या आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *