Dhananjay-Munde

सरकार ऊसतोड कामगारांच्या जीवावर उठले आहे का ? धनंजय मुंडेंचा सवाल

महाराष्ट्र राजकीय
सोलापूर : ट्रॅक्टरच्या टेपचा आवाज का वाढवला म्हणुन ऊस तोड वाहतुक करणा-या मजुराला पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना माढा तालुक्यात घडली. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भुमिका घेतल्यामुळे अखेर त्या मारहाण करणा-या पोलिसांविरूध्द ३०२ चा गुन्हा दाखल होऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बबनरावजी शिंदे शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखान्यासाठी ऊसतोड वाहतुकीचे काम करणारा सोनगिरी (ता. भुम, जि. उस्मानाबाद) येथील प्रदिप कल्याण कुटे (वय २४) हा स्वतःच्या कुटुंबियासमवेत ऊसतोड करून स्वतःच्याच ट्रॅक्टरमधुन कारखान्याकडे जात असताना रविवारी (दि.४) दुपारी मानेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दशरथ कुंभार व दीपक क्षीरसागर या दोघांनी त्यास ट्रॅक्टरच्या टेपचा आवाज का वाढवला या क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यास माढा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या प्रकरणी मयताचे नातेवाईक व सोनगिरी ग्रामस्थांनी त्या पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करूनही पोलीस चाल ढकल करत होते.
या घटनेची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना माहिती समजताच त्यांनी तातडीने संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक डीवायएसपी यांच्याशी संपर्क केला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सोलापूर ग्रामीणच्या जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करून त्या पोलिसांविरूध्द ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची, त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्वतः यात लक्ष घालुन या दोन्ही पोलिसांविरूध्द ३०२ चा गुन्हा दाखल करण्याच्या सुचना माढा पोलिसांना दिल्या. या पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाला असुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई ही करण्यात आली. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी ही मुंडे यांनी लावुन धरल्याने मयताचे पुन्हा सोलापुरच्या रूग्णालयात इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सोमवारी सायंकाळपर्यंत सुरु होती.
या घटनेबाबत प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. रक्षणकर्ते पोलीसच ऊसतोड मजुरांच्या जिवावर का उठले आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. ऊसतोड मजुरांना सरकार कोणत्याही सोई-सवलती, सुविधा देत नाही. ऊस तोड कामगार महामंडळाचाही पत्ता नाही, या मजुरांना साधी सुरक्षाही मिळु नये आणि पोलिसांच्या मारहाणीतच त्यांचा मृत्यु व्हावा ही अतिशय दुर्देवी घटना आहे. ऊसतोड मजुरांवर होणार्‍या या अन्यायाबद्दल आपण सरकारला जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले. या पोलिसांनी आवाज वाढवला म्हणुन नव्हे तर हप्ता वसुलीसाठी या मजुरांच्या वाहनाला आडवले असा आरोप करून हा हप्ता त्या पोलिसांसाठी होता का वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसाठी असा सवाल उपस्थित करून या प्रकरणी अधिक सखोल चौकशी करून वरिष्ठ पोलिस अधिका-यांवरही कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *