raj-cartoon-1

‘साहेब, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय’; राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून दिवाळी धमाके

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई : एकीकडे दिवाळीचे फटाके फुटत असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या कुंचल्यातून धमाके करत आहेत. राज ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळीनिमित्त चांगलीच फिरकी घेतली आहे. अभ्यंगस्नानावरुन फडणवीस तर नरकासुराच्या प्रतिकावरुन शाह यांचा ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

‘साहेब, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय, पाठवू?’ असे एक जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतानाचे व्यंगचित्र राज यांनी साकारले आहे. मंगळवारी असलेल्या नरक चतुर्दशीचे निमित्त साधत राज यांनी व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांना चांगलेच फटकारले आहे.

नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. याचाच संदर्भ घेत राज यांनी व्यंगचित्राद्वारे मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानाच्या परंपरेप्रमाणे आंघोळीच्या आधी अंगाला तेल लावून घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याचदरम्यान, एक जण येऊन त्यांच्या कानामध्ये बोलतो की, ‘साहेब… अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ‘धुवायला’ आलाय, पाठवू का?. ‘तर दुसरीकडे, चित्रात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमलेली दाखवण्यात आली आहे.

अमित शहा नरकासुर

राज यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे. ‘अमित शहा हे भाजपाला पडलेलं दिवाळी स्वप्न असून’, अमित शहा हे नरकासूर असल्याचा टोला राज यांनी लगावला आहे. व्यंगचित्रात अमित शहा यांना नरकासुराच्या स्वरुपात दाखवलं आहे. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा करण्यात येतो. मंगळवारी नरक चतुर्दशी असून अभ्यंगस्नान केल्या नंतर कारेटं पायाने फोडले जाते. त्याच कारेटे म्हणून अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे. थोडक्यात काय, तर भाजपा झोपलेली असून, अमित शहारुपी नरकासुराला चिरडण्याचे स्वप्न पाहत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *