20181106_135134

अप्पर जिल्हादंडाधिका-यांनी दिलेल्या आदेशामुळे घुंगरांचा आवाज ऐन दिवाळीत थांबला

महाराष्ट्र

जामखेड : मराठवाड्याच्या सरहद्दीवरील जामखेड तालुक्यातील कलाकेंद्र बंद करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मात्र राजकीय दबावामुळे कलाकेंद्रे कायमस्वरूपी बंद करण्याबाबत प्रशासनाकडून कुठलीच ठोस पाऊले उचलली जात नाहीत. कलाकेंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने जिल्हा प्रशासनाकडून बंधनकारक असताना ते तहसिल कार्यालयाकडून का घेतले या कारणावरून मात्र जामखेडमधील सहा कलाकेंद्रे बंद करण्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिका-यांनी दिल्याने कलाकेंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे ऐन दिवाळीत घुंगरांचा आवाज बंद झाला आहे.

 

कलाकेंद्रांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो, असा स्थानिकांचा आरोप आहे. जामखेडमधील जगदंबा कला केंद्र, झंकार संगीत पार्टी (दिवाणखाना), मोहा येथील नटराज संगीत बारी (दिवाणखाना), घुंगरू सांस्कृतिक कला केंद्र, पवार रेणूका सांस्कृतिक कला केंद्र, लक्ष्मी कला केंद्र या सहा कलाकेंद्रांनी कला केंद्र चालवण्यासाठी आवश्यक परवान्याचे अर्ज विहीत नमुन्यात जिल्हा प्रशासनाकडे न भरल्याने कला केंद्रांचे परवाने रद्द करण्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिका-यांनी जामखेडच्या तहसीलदारांना दिले आहेत.

कलाकेंद्र चालवण्यासाठी आवश्यक परवाने देण्याचा अधिकार सन २००६ पासुन जिल्हाधिकारी कार्यालयाला आहे. मात्र २००६ नंतरही जामखेड तहसिल कार्यालयाच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी आर्थिक मिलीभगत करत काही कलाकेंद्रांना तहसिल कार्यालय स्तरावर परवाने दिले आहेत. यावर जिल्हा प्रशासनाने तब्बल १२ वर्षांनी आक्षेप नोंदवत तहसिल कार्यालय स्तरावरून सहा कलाकेंद्रांना देण्यात आलेले परवाने रद्द करण्याचे आदेश दिले.

 

दरम्यान या आदेशानुसार जामखेड तहसिल कार्यालयाच्या वतीने त्या सहा कलाकेंद्रांना कलाकेंद्र बंद करण्याबाबतची नोटीस देण्यासाठी तहसिलचे एक पथक रात्री त्या कलाकेंद्रावर जाऊन आले. रात्री दोघा कलाकेंद्र चालकांनी नोटीसा स्वीकारल्या. मात्र अन्य चौघा कलाकार केंद्र चालकांनी नोटीसा स्वीकारल्या नाहीत. ज्यांनी नोटीसा स्वीकारल्या नाहीत त्या कलाकेंद्रांवर तहसिल विभागाच्या टीमने दुपारी 2 च्या सुमारास नोटीसा चिटकवण्याची कारवाई केली. या कारवाईत कामगार तलाठी सुखदेव कारंडे, बाळासाहेब भोगे, रमेश गायकवाड, सर्फराज पठाण, खंडू भोरे यांचा समावेश होता. दरम्यान ऐन दिपावलीच्या सीझनला कलाकेंद्र बंद करण्याची कारवाई प्रशासनाकडून झाल्याने कलाकेंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत. दिवाळीत घुंगरांचा आवाज बंद राहणार असल्याने कलाकेंद्रांवर शुकशुकाट दिसून येत होता.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *