mungantiwar-e1525538657534

तुमचे वन्य व प्राणिप्रेम मान्य, पण मला हल्ल्यात मृत पावलेल्या महिलांचाही विचार करावा लागतो : मेनका गांधी

महाराष्ट्र मुंबई राजकीय

मुंबई: केंद्रीय महिला व बाल कल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. तुमचे वन्य व प्राणिप्रेम मान्य, पण मला हल्ल्यात मृत पावलेल्या महिलांचाही विचार करावा लागतो, अशा शब्दांत मेनका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मेनका गांधी महिला व बाल कल्याण विकास मंत्री आहेत. मात्र, प्राणीप्रेमी असलेल्या मेनकांना वाघिणीच्या हल्ल्यात बळी ठरलेल्या महिलांसह १३ जणांपेक्षा जास्त वाघिणीचा जीवच महत्त्वाचा वाटतो, या आशयाचे समर्पक भाष्य मुनगंटीवार यांनी केले आहे.

मुनगंटीवार म्हणाले की, मेनका गांधी यांनी वाघिण ठार मारण्याबाबत केलेली टीका माहितीच्या अभावी केलेली दिसते. खरं तर वाघिणीला ठार करण्याचा निर्णय कोणताही मंत्री किंवा सचिव घेत नाही. हा निर्णय राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) गाईडलाईन्सनुसारच घेतला जातो. टी-१ वाघिणीबाबतही तसेच घडले आहे असे, मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. मेनका गांधी यांचे वन्यजीव प्राण्यांवर प्रेम आहे, ते मान्य पण त्या स्वत: महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत. वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलांचाही विचार मला करावा लागतो, अशा शब्दांत त्यांनी गांधी यांच्यावर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, ५ वर्षाच्या टी-१ या वाघिणीने जेव्हा पाच बळी घेतले तेव्हाच तिला पकडण्याचे आदेश दिले होते. मात्र, याविरोधात काही लोक कोर्टात गेले, त्यामुळे स्थगिती मिळाली. तोपर्यंत मागील दोन वर्षात वाघिणीने घेतलेल्या बळींचा आकडा १३ वर गेला, ज्यात महिलांचाही समावेश आहे. या काळात वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने चिडून हल्ला केला. अखेर सर्व प्रयत्न असफल होत असल्याने तिला ठार मारावे लागले. वन विभाग वाघिणीचे शत्रू नाही, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

हैदराबादमधील शॉर्प शुटर शआफत अली खान याच्यावर केलेल्या आरोपांवरही मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, खान यांची १५ दिवसापूर्वीच बिहार सरकारने नियुक्ती केली आहे. मेनका गांधी म्हणतात खान हा गुन्हेगार आहे तर मग तो बाहेर कसा? मेनका गांधी या स्वत: केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी खानचे वॉरंट काढून त्याला तुरूंगात डांबावे. वनविभागाचे हे काम नाही, अशा शब्दांत त्यांनी गांधींना फटकारले. याबाबत राज्य सरकारकडे तक्रार करण्याऐवजी पाच न्यायमूर्तींची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी लावावी, केंद्रीय मंत्री या नात्याने मेनका गांधी यांना तो अधिकार आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *