CM

मोदींना पाठिंबा नसेल तर मावळ आणि शिरूरमधून भाजपचे खासदार निवडून आणणार:मुख्यमंत्र्यांनी सेनेला ठणकावले

महाराष्ट्र मुंबई राजकीय
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणू. शिवसेनेने मोदींना पाठिंबा दिला तर ठीक, अन्यथा येथून भाजपचे खासदार निवडून आणू, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ठणकावले. शिवसेनेने भाजपसोबत लोकसभेला युती केल्यास मावळ व शिरूर या दोन्ही जागा शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना सोडण्यात येतील, असेही त्यांनी अप्रत्यक्षित सूचित केले.
पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर अटल संकल्प महासंमेलनाच्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित केलेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, दिलीप कांबळे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आमदार चंद्रकांत हाळवणकर, प्रशांत ठाकूर, बाबुराव पाचार्णे, योगेश टिळेकर, खासदार अमर साबळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह मावळ आणि शिरूर मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आज होत असलेली सभा भाजपने कोणाविरूद्ध घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी कोण आहे, हे समजून घेण्यासाठी ही सभा आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सभा होतेय, याचा अर्थ आम्ही येथून लढणार असा नाही. तर, या दोन्ही मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणण्यासाठी ही सभा घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मावळ आणि शिरूरमधून मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणले जातील. शिवसेनेने मोदींना पाठिंबा दिला तर उत्तमच, आम्ही त्यांचे खासदार पाठवू. पण तसे झाले नाही तर या दोन्ही मतदारसंघातून भाजपचे खासदार निवडून आणू. मोदींना पंतप्रधान करणे ही देशाची गरज आहे. त्यांच्यासारखे कणखर नेतृत्व देशाला हवे आहे. त्यामुळे त्यांना जे पाठिंबा देतील, त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असेच खासदार निवडून आणू, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा आगामी निवडणुकीत आम्ही दारूण पराभव करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आमचे काँग्रेस-राष्ट्रवादीला खुले आव्हान आहे. तुमचे १५ वर्षांचे राजकारण अन् आमची चार वर्षाची सत्ता याची तुलना एका व्यासपीठावर होऊ द्या. जर आम्ही यात उजवे ठरलो नाही तर आगामी निवडणुकीला सामोरे जाणार नाही. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे थेट पैसे जमा केले. शेतक-यांना कर्जमाफीसह वेगवेगळ्या योजनांतून आम्ही ५० हजार कोटी रूपये दिलेे आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने केवळ ८ हजार कोटी दिले होते. भाजप सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून दिला. रस्ते आणि सिंचन क्षेत्रात सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले. आघाडीच्या कालखंडात सिंचनाच्या नावावर यांनी करोडो रूपये लुटले, असे सांगत त्यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.
भाजपच्या सभेला मोठा प्रतिसाद
भाजपने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारची सभा पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केली होती. या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. मावळ तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक लोक आजच्या सभेला पोहचले होते. त्यामुळे निगडीतील धिंग्रा मैदान खचाखच भरले होते. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरलेले दिसले.
पोलिस अजितदादांच्या दारात, कोणत्याही क्षणी अटक- दानवेंची फटकेबाजी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यावर सडकून टीका केली. दानवे म्हणाले, अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पोलीस अजित पवारांच्या दारापर्यंत पोहचले आहेत. आता अजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *