India-team-celebrate

भारताने वेस्ट इंडिज ला नमवून मालिका ‘३-१’ अशी घातली खिशात

क्रीडा देश

थिरुवनंतपुरम : पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय लढतीमध्ये गुरुवारी नऊ विकेट आणि ३५.५ षटके राखून विजय मिळवत विराट कोहली आणि सहका-यांनी वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली.

प्रतिस्पध्र्याचे १०५ धावांचे आव्हान पार करण्यासाठी भारताला केवळ १४.५ षटके पुरेशी ठरली. डावखुरा सलामीवीर शिखर धवन (६) याने निराशा केली, तरी फॉर्मात असलेला सलामीवीर रोहित शर्माने नाबाद अर्धशतकी खेळी करताना विजयात मोलाचे योगदान दिले.

रोहितने वनडेतील ३८वे अर्धशतक झळकावले. त्याने ५६ चेंडूंत नाबाद ६३ धावा फटकावल्या. त्यात ५ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. रोहितने केवळ वैयक्तिक कामगिरीमध्ये सातत्य राखले नाही तर कर्णधार विराट कोहलीसह दुस-या विकेटसाठी ९९ धावांची नाबाद भागीदारी रचताना १५व्या षटकातच भारताच्या मोठय़ा विजयावर शिक्कामोर्तब केले. कोहलीने २९ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या.

मुंबईपाठोपाठ केरळमधील वातावरणही वेस्ट इंडिजला मानवले नाही. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील पाहुणा संघ केवळ ३१.५ षटकांमध्ये १०४ धावांमध्ये आटोपला. त्यात सर्वाधिक योगदान कर्णधार होल्डरचेच आहे. त्याने २५ धावा केल्या. त्याच्यासह अष्टपैलू मार्लन सॅम्युअल्स (२४ धावा) आणि सलामीवीर रोवमन पॉवेल (१६ धावा) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या. वेस्ट इंडिजचा सलामीवीर कीरान पॉवेल आणि ब-यापैकी फॉर्म राखलेला तिस-या क्रमांकावरील शाई होप यांना खातेही उघडता आले नाही. शिमरॉन हेटमीयर (९ धावा) याला सातत्य राखता आले नाही. सॅम्युअल्ससह होल्डरने थोडा प्रतिकार केला तरी मोठी खेळी करण्यात त्यांना अपयश आले.

वेस्ट इंडिजचे फलंदाज पुन्हा खराब खेळले तरी भारतीय गोलंदाजांच्या अचूक आणि प्रभावी मा-याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजा (९.५-१-३४-४) सर्वात प्रभावी ठरला.

वेगवान गोलंदाज त्रिकूट भुवनेश्वर कुमार (४-१-११-१), जसप्रीत बुमरा (६-१-११-२), खलील अहमद (७-१-२९-२) यांच्यासह ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादव (५-१-१८-१) यांनीही प्रतिस्पध्र्याना धावांपासून रोखले.

भारताने पहिली, चौथी आणि पाचवी वनडे जिंकत पाच सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. वेस्ट इंडिजने तिस-या लढतीत (पुणे) विजय मिळवला. उभय संघांमधील दुसरी वनडे बरोबरीमध्ये (टाय) सुटली. पहिल्या आणि पाचव्या सामन्यातील भारताचे विजय मोठय़ा फरकाने मिळवलेले आहेत.

संक्षिप्त धावफलक :

वेस्ट इंडिज – ३१.५ षटकांत सर्वबाद १०४(होल्डर २५, सॅम्युअल्स २४, रवींद्र जडेजा ३४-४, जसप्रीत बुमरा ११-२, खलील अहमद २९-२) वि. भारत – १४.५ षटकांत १ बाद १०५(रोहित शर्मा नाबाद ६३, विराट कोहली नाबाद ३३).

निकाल : भारत ९ विकेट राखून विजयी. 
५ सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. 
सामनावीर : रवींद्र जडेजा. 
मालिकावीर : विराट कोहली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *