NNR1

जिवंत असेपर्यंत एकाही प्रकल्पग्रस्ताला वाऱ्यावर सोडणार नाही:निलेश राणे यांनी दिले आश्वासन

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय
मुंबई : प्रकल्पग्रस्तांना योग्य प्रकारे काम देण्याची ठोस भूमिका कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. या भूमिकेची अंमलबजावणी प्रशासनाकडून लवकरच केली जाईल, असे आश्वासन रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली आहे.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात गुरूवारी निलेश राणे यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी  कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांवर कोकण रेल्वेकडून सातत्याने अन्याय केला जात असल्याने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी पुढाकार घेतला होता.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा मेळावादेखील आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. कोकण रेल्वेकडून विविध पदांसाठी केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सामावून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना निलेश राणे यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची आपली भूमिका राहील, असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार गुरूवारी निलेश राणे यांनी रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. या चर्चेदरम्यान प्रशासनाकडूनही सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन श्री. गुप्ता यांनी दिले असून, त्याची अंमलबजावणी तात्काळ केली जाईल, असेही त्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले.
या बैठकीनंतर निलेश राणे यांनी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले. त्यावेळी प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला योग्य दर्जाप्रमाणे काम मिळेल. त्याप्रमाणे प्रत्येकाने कामाला सुरूवात करावी. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आपण एकाही प्रकल्पग्रस्ताला वाऱ्यावर सोडणार नाही, असेही निलेश राणे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने कामाला सुरूवात करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याबद्दल  कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी तसेच प्रकल्पग्रस्तांनी निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *