congress-NCP-copy-e1524758477619

काँग्रेस-राष्ट्रवादीचं ४० जागांवर ठरलं ; आता ८ जागांसाठी घोडे अडले

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय
मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांची लगीनघाई सुरु झाली आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांत आघाडी होणार असून ४० जागांवर उभयपक्षांचे एकमत झाले आहे. उर्वरित ८ पैकी ४ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असून चार जागांची अदलाबदल करण्यावरून घोडे अडले आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे नवे भिडू दाखल होणार आहेत. त्यांना कोणत्या जागा सोडायच्या, हा प्रश्न आहे. काँग्रेसबरोबर जाऊ पण राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली असली तरी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीची शुक्रवारी एक बैठक झाली त्यातही जागा वाटपावर चर्चा करण्यात आली.
अकोल्याची जागा आंबेडकरांना, हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना, पालघरची जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला आणि अमरावतीची जागा राजेंद्र गवई याना सोडण्याचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत घाटत आहे.
पुणे, औरंगाबाद, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण अहमदनगर या चार जागांवर अदलाबदलीची चर्चा सुरु आहे. दक्षिण अहमदनगरमधून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील इच्छूक आहेत, तर पुण्याची जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी इच्छूक आहे. औरंगाबादमधून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण इच्छूक आहेत आणि उत्तर मध्य मुंबईची जागाही राष्ट्रवादीने मागितली आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीत चर्चेच्या अनेक फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आणखी एक दोन फेऱ्या झाल्यानंतर जागा वाटपावर एकमत होईल अशी दोन्ही गोटातील सूत्रांची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *