धार / इंदूर : जग समजण्यासाठी तुमच्याकडे केवळ एक गुण असावा तो म्हणजे मानवता होय. कोणी तुमच्यावर रागवले तरी तुम्हाला ते समजून घेता आला पाहिजे आणि भाजपपेक्षा मला हिंदू धर्म अधिक चांगला समजतो, असे सडेतोड उत्तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिले आहे.भाजपने राहुल गांधी यांचे गोत्र कोणते, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला गांधी यांनी दिलेले हे उत्तर मानण्यात येते.
इंदूर येथे राहुल गांधी यांनी लहान मुलांसोबत आईस्क्रीमचा आनंदही लुटला. त्यानंतर त्यांनी धार येथे एका सभेला संबोधित केले. शेतक-यांच्या मालाला किमान भावही मिळत नसल्याने शेतक-यांना आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारावा लागत असून त्यांची स्थिती विदारक होत चालल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतक-यांच्या या अवस्थेला सरकारची धोरणेच जबाबदार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
शेतक-यांच्या स्थितीची मांडणी करताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जोरदार हल्ला चढवला. त्यांनी यासाठी काही उदाहरणेही दिली. ते म्हणाले, एक किलो बटाट्यासाठी शेतक-याला पाच रुपयेही मिळत नसताना बटाट्याच्या चिप्सचे पाकीट मात्र पाच रुपयांना विकले जाते. हे पाकीट केवळ एका बटाट्यापासून बनते. म्हणजेच या बटाटा चिप्सच्या पाकीटाचा उत्पादन खर्च किती कमी असतो. पण शेतक-यांच्या वाट्याला यातील पन्नास पैसेही येत नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या स्थितीची कल्पना तुम्हाला येऊ शकते. आम्हाला शेतक-यांच्या स्थितीची कल्पना असून केवळ काँग्रेस पक्षच शेतक-यांचे प्रश्न सोडवू शकतो. सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी अधिकच रसातळाला चालला असल्याची टीका त्यांनी केली. व्यापम घोटाळा आणि पनामा पेपर्सचा उल्लेख करत त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह-चौहान यांच्यावरही हल्ला चढवला.