कर्जत : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमासाठी शिवसैनिकांकडून कर्जतभर बेकायदा बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दांडगाईचा आणि बेकायदा बॅनरबाजीचा फटका स्थानिक मराठी आणि मराठा कंत्राटदारांना बसत असून, लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे संतोष सावंत यांच्या श्रुती जाहिरात कंपनीला नगरपरिषद हद्दीत जाहिराती लावायचे कंत्राट 3 वर्षासाठी मिळाले आहे. यासाठी सावंत लाखो रुपयांचा महसूल नगर परिषदेला प्रतिमहा देत असतात. मात्र कुठलाही राजकीय कार्यक्रम असल्यावर राजकारणी त्यांच्या जाहिरात फलकावर जबरदस्तीने होर्डिंग लावतात. सावंत यांनी वारंवार तक्रार करूनही पोलीस व नगरपरिषद त्यांच्या प्रकरणाची दखल घेत नाहीत. ही बेकायदा बॅनरबाजी मग सावंत याना स्वखर्चातून काढावी लागते.

मागे एकदा सावंत यांनी बेकायदा बॅनर हटवले असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सावंत यांचे १६ लोखंडी सांगाडे जेसीबी लावून जमीनदोस्त केले होते. त्याची साधी तक्रारही कर्जत पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. याबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्द होऊन देखील सावंत यांना न्याय मिळालेला नाही.
मराठा असल्यानेच अन्याय करता का?
येत्या १ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा कर्जत येथे होत असून सावंत यांच्या मालकीच्या जाहिरात सांगाड्यावर सर्वत्र शिवसेनेने जबरदस्तीने होर्डिंग लावल्याने सावंत यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. मी मराठा असल्यानेच तुम्ही माझ्यावर अन्याय करता का? असा प्रश्न सावंत यांनी प्रशासनाला विचारला आहे. शिवसेना सत्तेत असून गृहराज्यमंत्री शिवसेनेचे आहेत पण मी मराठी, त्यात मराठा असल्याने मला विरोध होतो का? असा सवाल सावंत यांनी केला आहे.
न्यायालयाचाही अवमान
मुंबई उच्च न्यायालयाने १५५/२०११ या याचिकेत निवडणुकीव्यतिरिक्त पूर्वपरवानगीशिवाय स्वतःचे फोटो असलेले होर्डिंग लावायला राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांना मनाई केली आहे. मात्र तरीही सत्तेत असलेली शिवसेना न्यायालयाचाही अवमान करीत आहे. आता न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल सावंत यांनी केला आहे.
Share on Social Media