Nilesh-Rane2

नोव्हेंबरमध्ये आरक्षण न मिळाल्यास रस्त्यावर उतरू! : निलेश राणे यांनी दिला इशारा

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

अकलूज : मराठा समाजाला नोव्हेंबर महिन्यापर्यंत आरक्षण देणारच, असे ठोस आश्वासन सरकारने दिले आहे, ते आश्वासन पाळावे, आता कोणतीही पळवाट काढू नये. नोव्हेंबरमध्ये ठरल्याप्रमाणे आरक्षण मिळाले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी दिला. राज्यात शिवसेना-भाजपची युती झाली, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्या युतीत नसेल, असेही ते म्हणाले.

माळशिरस येथे एका खासगी कार्यक्रमासाठी निलेश राणे आले असता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना रोख-ठोक उतरे दिली. ते म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत समाजाच्या भावना तीव्र आहेत. नोव्हेंबपर्यंत सर्व प्रकारच्या प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे. आता त्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. आयोगाचे कामकाज पूर्ण झाले नाही, वगैरे कोणतीही पळवाट काढू नये. तशी पळवाट काढून आरक्षण लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आता भाजपसोबत आहे. भविष्यात शिवसेना-भाजपने युती केली तर तुम्ही त्यांच्यासोबत राहणार का, असे विचारले असता निलेश राणे म्हणाले की, याबाबतची अधिकृत भूमिका पक्षाचे संस्थापक खा. नारायण राणेसाहेबांनी यापूर्वीच जाहीर केलेली आहे. भाजप शिवसेनेसोबत युती करणार असेल तर आम्ही कदापि त्यांच्यासोबत जाणार नाही, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना यापूर्वीच सांगितलेले आहे. तेव्हा राणेसाहेबांची भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे, असे निलेश राणे म्हणाले.

शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला निघालेल्या बोटीला अपघात होऊन एकाचा बळी गेल्याच्या घटनेबाबत विचारले असता निलेश राणे म्हणाले की, पंतप्रधानांच्याहस्ते शिवस्मारकाची पायाभरणी झाली असताना, पुन्हा पायाभरणीचा घोळ कशासाठी घातला? या उतावळेपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी बाब आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक भव्य स्वरूपात झाले पाहिजे. आता तिथे वेळकाढूपणा होऊ नये, असेही निलेश राणे म्हणाले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *