manohar-parrikar

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर घेणार मंत्रिमंडळ बैठक

देश राजकीय
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारी(३१ ऑकटोबर) आपल्या निवासस्थानी मंत्रीमंडळ बैठक घेणार आहेत. राज्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी ही माहिती दिली. या मंत्रिमंडळ बैठकीमुळे पर्रीकर यांच्या जीविताबद्दल शंका कुशंका उपस्थित करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळणार आहे.
मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या विकाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर आधी अमेरिकेत आणि नंतर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ते गोव्यात परतले. मात्र त्यांना पुन्हा एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना गोव्यात नेण्यात आले. सध्या ते त्यांच्या दोना पावला येथील निवासस्थानी एम्सच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
पर्रीकर मुख्यमंत्री असतील तर आणि तरच पाठिंबा देऊ, अशी भूमिका गोव्यातील भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी घेतली होती. तर मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा पवित्रा  भाजपच्या नेत्यांनी घेतला होता. सरकारला कोणताही धोका होऊ नये, म्हणून भाजपने काँग्रेसच्या दोन आमदारांना फोडून आपल्याकडे घेतले आहे.
दरम्यान, पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तर्क वितर्क आणि शंका कुशंकांना उधाण आले आहे. पर्रीकर जर जिवंत असतील तर त्यांना जनतेसमोर आणा, आणि ते जिवंत असल्याचे सिद्ध करा, असे आव्हान आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी दिले होते. त्यामुळे गोव्यात खळबळ उडाली होती. आता मंत्रिमंडळ बैठकीमुळे या शंकांना विराम मिळणार आहे.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *