virat-1

विराटची शतकी खेळी व्यर्थ:वेस्ट विंडीजने साधली बरोबरी

क्रीडा देश

पुणे : वेस्ट इंडिज संघाने सर्व आघाडय़ांवर खेळ उंचावताना भारताविरुद्धची तिसरी लढत ४३ धावांनी जिंकली. तसेच पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यजमानांच्या पराभवामुळे कर्णधार विराट कोहलीचे (११९ चेंडूंत १०७ धावा) शतक व्यर्थ ठरले. त्याचे हे सलग तिसरे शतक आहे.

पाहुण्यांचे २८४ धावांचे आव्हान यजमानांना पेलवले नाही. भारताचा डाव ४७.४ षटकांत २४० धावांमध्ये संपला. विराट एकाकी लढला. त्याने ३८वे शतक ठोकताना ११९ चेंडूंत १०७ धावांची खेळी साकारली. त्यात १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. विराटला सलामीवीर शिखर धवन (३५ धावा) वगळता कुणीही साथ दिली नाही. उपकर्णधार रोहित शर्मा (८ धावा) लवकर बाद झाला. अंबती रायुडू (२२ धावा) आणि रिषभ पंत (२४ धावा) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अनुभवी महेंद्रसिंग धोनीनेही (७ धावा) निराशा केली.

विराट मैदानावर असेपर्यंत विजयाची आशा होती. मात्र मार्लन सॅम्युअल्सने त्याची विकेट मिळवत वेस्ट इंडिजचा मालिकेतील पहिला विजय निश्चित केला. पाहुण्यांतर्फे सॅम्युअल्स (३.४-१-१२-३) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. वेस्ट इंडिजने निर्धारित ५० षटकांत ९ बाद २८३ धावांची मजल मारली. त्याचे श्रेय ‘वनडाउन’ फलंदाज शाइ होप (११३ चेंडूंत ९५ धावा) याच्यासह नवव्या क्रमांकावरील अ‍ॅश्ली नर्स (२२ चेंडूंत ४० धावा) यांना जाते. होप याने सातत्य राखताना भारताच्या गोलंदाजांवर वर्चस्व मिळवले. त्याच्या झटपट खेळीमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. होपमुळे आशा उंचावलेल्या वेस्ट इंडिजच्या तळातील फलंदाजांनी फटकेबाजी केली. नर्स याने कीमार रोच (नाबाद १५ धावा) याच्यासह नवव्या विकेटसाठी अवघ्या ३६ चेंडूंत ५६ धावा जोडताना संघाला तीनशेच्या घरात नेले.

भारतातर्फे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने (१०-१-३५-४) अप्रतिम ‘स्पेल’ टाकला. मात्र त्याला अन्य सहका-यांची अपेक्षित साथ लाभली नाही. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या १० षटकात ७०, खलील अहमदच्या १० षटकांत ६५ धावा निघाल्या. युझवेंद्र चहल (५६-१) आणि कुलदीप यादव (५२-२) यांनाही छाप पाडता आली नाही.

पहिली वनडे जिंकून भारताने आघाडी घेतली तरी दुसरी लढत ‘टाय’ करताना वेस्ट इंडिजने भारताचा विजयी वारू रोखला. त्यानंतर तिसरी वनडे जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. उभय संघांमध्ये चौथी लढत सोमवारी (२९ ऑक्टोबर) क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबर्न स्टेडियमवर होईल.

शतकांची हॅट्ट्रिक
पुण्यामध्ये शतक झळकावताना विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. सलग तीन सामन्यांत शतक ठोकणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे. कोहलीचे वेस्ट इंडिजविरुद्धचे हे चौथे शतक आहे. एखाद्या संघाविरुद्ध शतकांचा ‘चौकार’ मारणारा तो जगातील पहिलाच फलंदाज आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *