sakshana salgar

‘राम कदमांना बडवायला चप्पलेचे १०० कोल्हापूरी जोड आणलेत’ : सक्षणा सलगर

महाराष्ट्र राजकीय

पुणे: मुली, महिलांना उचलून नेऊ असे म्हणणा-या भाजप आमदार राम कदम यांना हाणायला मी कोल्हापूरातून १०० कोल्हापूरी जोड आणले आहेत. हे चप्पलांचे जोड मी राम कदमसारख्या भामट्यांना बडवायला राष्ट्रवादी युवती काँग्रेसला देणार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी हल्लाबोल केला. आमदार राम कदम यांच्यासह प्रशांत परिचारक, मेधा कुलकर्णींवरही सलगर यांनी शरसंधान साधले.

देशाच्या संविधानावर तसेच देशावर जे संकट आले आहे, त्याबाबत जनजागृती करण्याचा ‘संविधान बचाव’ कार्यक्रम आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बालेवाडीत पार पडला. यावेळी सलगर यांनी भाजपच्या धोरणांसह त्यांच्या नेत्यांवर चांगलाच हल्लाबोल केला.

सलगर म्हणाल्या, ‘बेटी बचाव ऐवजी बेटी भगाव असा कार्यक्रम आजकाल त्यांचा सुरू झाल्याने आम्हाला ‘संविधान बचाव’ आंदोलन करावे लागत आहे. आज राम नव्हे रावण आसपास आहेत. त्यामुळेच काल आम्ही कोल्हापूरात पक्षाच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्यावेळी मी कोल्हापूरातून १०० कोल्हापूरी चप्पलेचे जोड खरेदी केले. हे जोड मी राष्ट्रवादी युवती काँग्रेसला देणार आहे ज्यामुळे त्या राम कदमांसारख्यांना बडवतील. एकीकडे राम कदम मुली पळवून न्यायची भाषा करतोय तर प्रशांत परिचारकसारखा आमदार सैनिकांच्या पत्नीच्या चारित्र्यांवर शिंतोडे उडवत आहे, असे सांगत परिचारकांवरही सडकून टीका केली.

पुण्यातील भाजप आमदार मेधा कुलकर्णीवर टीका करताना सलगर म्हणाल्या, जर फुले-शाहू-आंबेडकर विचाराचे राज्य आले नसते तर मेधाताईंसह तमाम महिला चूल आणि मूलमध्ये अडकून भाक-या भाजत बसल्या असत्या. त्यामुळे मेधाताईंनी जपून बोलावे. भुजबळांना धमकीचे पत्र पाठविणा-यांचाही सलगर यांनी खरपूस समाचार घेतला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *