deepak_kesarkar1

पालकमंत्री दीपक केसरकर यांना इशारा; धनगर समाजाच्या समस्या सोडवा, अन्यथा फिरू देणार नाही: रा.स.प. जिल्हाध्यक्ष किशोर वरक

कोकण महाराष्ट्र मुंबई

सावंतवाडी : पालकमंत्री दीपक केसरकर यांना दोन वेळा आमदार ते मंत्री बनविण्यामध्ये धनगर समाजाचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, दीपक केसरकर हे पालकमंत्री असूनही पालकत्व विसरले आहेत. ते धनगर समाजाची छळवणुक व पिळवणुक करीत आहेत. केसरकर यांच्या केसरी गावातील त्यांचेच कार्यकर्ते, सरपंच व माजी पं.स.सदस्य हे धनगर समाजातील लोकांना बेघर करत आहेत, हे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील रा.स.प.कार्यकर्ते, धनगर, दलित, समाजातील वंचित लोक कदापी सहन करणार नाहीत. केसरकरांनी पंधरा दिवसात केसरी आलाटीवाडीतील लोकांच्या घरांना घर नंबर मिळवून देऊन त्यांच्या इतरही सर्व समस्या सोडवाव्यात. अन्यथा सोळाव्या दिवसापासुन रा.स.प.कार्यकर्ते तसेच धनगर-दलित वंचित समाजाचे कार्यकर्ते केसरकर यांना जिल्हयात फिरू देणार नाहीत असा इशारा रा.स.प. जिल्हाध्यक्ष किशोर वरक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

केसरी आलाटीवाडी येथील धनगर समाजाला शासनाने भुमीहीन ठरवून दिलेल्या जमिनी केसरकर यांच्याशी संबंधित असणा-या धेंपो कंपनीने धनगर समाजातील लोकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन बेकायदेशीर करार करून बळकावल्या होत्या. मात्र, धनगर समाज बांधवांना घरे बांधण्यासाठी स्वत:ची इतरत्र जागा नसल्याने समाजातील लोकांनी इंदिरा आवास योजनेअंतर्गत व वैयक्तीकरित्या सदर केसरी आलाटीवाडी येथील स्वत:च्या नावे असणा-या जमिनीत १८ पक्की व कच्ची झोपडीवजा घरे बांधली आहेत. मात्र, सदर जागा कंपनीस देतेवेळी मुख्य एजंट म्हणून काम करणारा दीपक केसरकर यांचा खंदा समर्थक माजी पं.स. सदस्य राघोजी सावंत याने धनगर समाजाची जागा धेंपो कंपनीला बेकायदेशीर करार करून देत धनगर समाज बांधवांना तेथून हुसकावून घालवले होते. धनगर समाज हा भटका आदिवासी समाज असल्याने त्यांनी काही वर्षे दाणोली नानापाणी येथील जंगलात आश्रय घेतला होता. मात्र, तेथील जमिन मालकांनी त्यांना हुसकावून लावल्यानंतर सदरील १८ कुटुंबियांनी केसरी आलाटीवाडी येथे शासनाने दिलेल्या जागेमध्ये घरे बांधली आहेत. मात्र, सदर ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असून ग्रामपंचायतीचे मायनिंग कंपनीशी साटेलोट असल्याने ग्रामपंचायतीने गेल्या ७ वर्षात धनगर समाजातील लोकांना हुसकावून लावण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यांना लाईट, पाणी, रस्ता, घरे व सर्व जीवनावश्यक सोयींपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले आहे. याबाबत रा.स.प.कार्यकर्ते, धनगर समाजातील सर्व संघटना, धनगर समाज, दलित व इतर वंचित समाजाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत असून केसरकर यांनी १५ दिवसात केसरी आलाटीवाडी येथील लोकांना न्याय न दिल्यास सोळाव्या दिवसापासून केसरकर यांना रा.स.प.कार्यकर्ते, धनगर, दलित व इतर वंचित समाजाचे लोक जिल्ह्यात फिरू देणार नाहीत, असा इशारा दिला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *