मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (दि २५) संध्याकाळी एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईकडे रवाना झाले.
राज ठाकरे सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असून, त्यांनी अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा दौरा केला. या दौर्यात त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या, तसेच सामान्य माणसात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हा दौरा अपेक्षेहून अधिक यशस्वी झाला. तो दौरा गुरुवारी आटोपला आणि ते मुंबईकडे येण्यासाठी निघाले. दुसरीकडे शरद पवार यांची औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद होती ती आटोपून तेही मुंबईकडे रवाना झाले. दोघे एकाच विमानातून मुंबईकडे येत असल्याचे वृत्त पसरल्याने त्याची चर्चा सुरु झाली होती.
पुण्यात राज यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत खूप गाजली. त्यानंतर राज हे पवारांचे हस्तक असल्याची टीका विरोधकांकडून केली जाऊ लागली. सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून भाजपविरोधात महा आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या आघाडीत मनसेला सहभागी करून घ्यावे यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असल्याची बोलवा आहे. राज्याच्या राजकारणात राज यांचे स्वतःचे स्थान असले तरी त्यांच्या पक्षाची स्थिती मात्र खूपच बिकट आहे. पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी राज यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे राज आणि पवार यांच्या जवळिकीकडे कुतूहलाने पाहिले जात आहे.
Share on Social Media