सांगली : राज्य सरकारने नुकतीच राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. यात सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, पलूस आणि कडेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. मात्र दुष्काळाने होरपळणा-या तासगाव व मिरज पूर्व भागाला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे जिल्ह्याकडे असलेले दुर्लक्ष्य याला कारणीभूत असल्याचा आरोप संतप्त शेतक-यांनी केला आहे. कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नुकताच या तालुक्यांचा दौरा केला होता. त्यांचा दौरा म्हणजे निव्वळ दुष्काळी पर्यटन ठरले असल्याची प्रतिक्रिया शेतक-यांतून व्यक्त होत आहे.
खासदार, आमदारांचा तालुका वगळला
तासगाव तालुक्याचे प्रतिनिधीत्व आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे आहे. खासदार संजय पाटील या तालुक्यातील चिंचणी गावचे आहेत. तरीही तासगाव तालुक्याला दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. याउलट भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या विधानसभा मतदार संघातील पलूस व कडेगाव या दोन तालुक्यांचा दुष्काळसदृश तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यावर्षी पावसाने सांगलीकडे पाठ फिरवली. दुष्काळी तालुक्यात पावसाविना खरीप वाया गेला. रब्बीचीही परिस्थिती नाजूक आहे. पाऊस कमी झाल्याने भूजल पातळीतही घट झाली आहे. पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. विहरी, कुपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. कायम दुष्काळी असलेल्या कवठेमहांकाळ, जत, तासगाव, मिरज पूर्व, खानापूर, आटपाडी या तालुक्यांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील आठवडय़ात पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. दरम्यान, राज्यात १८० तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली.
या तालुक्यांमध्ये लवकरच टंचाईचे लाभ देण्याचे अध्यादेश काढण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे. यामध्ये जिह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, पलूस आणि कडेगाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या तालुक्यांना टंचाईचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या बाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुष्काळसदृश्य तालुक्यांमधून तासगाव व मिरज पूर्व भागाला वगळण्यात आले असल्याची चर्चा आहे. तासगाव व मिरज पूर्व भागात मोठी पाणी टंचाई आहे. असे असताना या तालुक्यांना वगळण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.