shivaji

शिवस्मारकाच्या पायाभरणीला गालबोट, स्पीडबोटीला अपघात;२ जण अजूनही बेपत्ता, शुभारंभाचा कार्यक्रम रद्द

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

shivaji

मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणी बांधकामाला सुरुवात करण्यासाठी निघालेल्या स्पीड बोटीला अपघात झाला आहे. या बोटीत २५ जण होते. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे समजते. सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास हा अपघात झाला.

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह कंत्राटदार, शासकीय अधिकारी, काही पत्रकार आणि कर्मचारी स्पीड बोटींनी अरबी समुद्रामध्ये निघाले होते. एकूण चार बोटी होत्या. मात्र, त्यांच्यातील एक स्पीड बोट खडकावर आदळली आणि बोटीत पाणी शिरल्याने हाहा:कार उडाला.

बुडत असलेल्या स्पीड बोटीतील लोकांना अन्य बोटीतील सहका-यांनी आपल्या बोटीत खेचले. बोटीतील सर्वांना वाचवण्यात यश आल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्यापही २ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु असल्याचे समजते.

अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीजवळ नियोजित स्थळी शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. मात्र अपघातामुळे पायाभरणीचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

दोन बोटींच्या मदतीने बचाव व शोधकार्य सुरु आहे. तटरक्षक दलाचे दोन हेलिकॉप्टर बचावासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच अग्निशमन दलाचे जवानही किना-यावर पोहोचले आहेत.

दरम्यान, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक उभारण्याचे कंत्राट एल. अँड टी. कंपनीला दिले आहे. आजपासून या स्मारकासाठी समुद्रात नियोजित स्थळी भराव टाकला जाणार होता.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *