School-copy

रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास साडेसहाशे शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट?

कोकण महाराष्ट्र मुंबई शिक्षण

रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यालाही बसणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सुमारे ६५० प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या शाळा तातडीने बंद करण्यात येणार नसल्या, तरी कमी पटसंख्येच्या नावाखाली चालू शैक्षणिक वर्षात शेकडो शाळा बंद करून तेथील मुलांचे अन्य जवळच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित शाळांमधील शिक्षकवर्गातही अस्वस्थता पसरली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या २ हजार ६२१ प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये सुमारे ७ हजार ५०० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. या शाळांमध्ये शून्य ते दहा पटसंख्येच्या सुमारे ६५० प्राथमिक शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येतात. तसेच या शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमही राबविले जात आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनाही वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरीही खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओघ चिंतेची स्थिती निर्माण करणारा आहे.

दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्याने पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना सतत आटापिटा करावा लागतो. पटसंख्या कमी झाल्यास शिक्षकांनाही अतिरिक्त ठरण्याची भीती सतत जाणवत असते. त्यामुळे पटसंख्येअभावी शाळा बंद होऊ नये, यासाठी शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांची शोधमोहीम सतत सुरू असते. ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहूनच शिक्षकांची निश्चिती करण्यात येते. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षामध्ये किती शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत, हे आता लवकरच समजणार आहे.

आरटीई कायद्यानुसार कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. मागील शैक्षणिक वर्षामध्ये पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या ८८ शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यंदाही पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. कमी पटसंख्येमुळे शाळा बंद करण्यात आल्याने मागील शैक्षणिक वर्षात १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असून, त्याला शिक्षक संघटनांकडून जोरदार विरोध सुरू आहे. शाळा बंद झाल्यास त्याचे परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *