rajushetty

भाजपच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र आणणार, आंबेडकरांचा प्रस्ताव राहुल यांना देणार- खा .राजू शेट्टी

महाराष्ट्र राजकीय

जेजुरी (पुणे)- केंद्रात व राज्यात असलेल्या भाजप सरकारने शेतकरी, सर्वसामान्यांसह सर्वच घटकांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व समविचारी छोट्या-मोठ्या पक्षांना एकत्र आणण्याबाबत मी पुढाकार घेणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचीही हीच भूमिका असून, भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी एक व्यापक आघाडी करावी. यात छोट्यांनाही योग्य स्थान दिले द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. आंबेडकरांचा हा प्रस्ताव घेऊन मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहे, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी मांडली.

पुण्याजवळील जेजुरी येथे आयोजित केलेल्या सत्तासंपादन निर्धार मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी म्हणाले, केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने शेतक-यांसह समाजातील सर्वच घटकांची घोर फसवणूक केली आहे. सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. २०१४ साली गोपीनाथ मुंडेंमुळे आम्ही महायुतीत गेलो. मात्र, आताची भाजप कोणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे यांना सत्तेतून घालविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच कधीकाळी आम्ही विरोध केलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची आमची तयारी आहे. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक व्यापक महाआघाडी तयार करावी अशी प्रकाश आंबेडकरांची इच्छा आहे. माझीही तीच भूमिका आहे. मात्र, हे करताना आमच्यासारख्या व इतर छोट्या पक्षांवर अन्याय होणार नाही व त्यांची गळचेपी होणार नाही याची काळजी प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीला घ्यावी लागेल. प्रकाश आंबेडकरांचा महाआघाडीचा प्रस्ताव घेऊन मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार आहे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणे व योग्य हमी भाव जाहीर केल्यास आम्ही महाआघाडीसोबत जाऊ. सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी किमान समान कार्यक्रम काँग्रेसने आखावा. असे झाल्यास प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीसह मी महाआघाडीत लागलीच जाण्यास तयार आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *