nr

निलेश राणेंची बांद्यात कडवट टीका : दीपक केसरकर निष्क्रिय पालकमंत्री

कोकण मुंबई राजकीय

nr

 

 

 

 

 

 

 

 

बांदा : बांदा आणि राणे कुटुंबियांचे नाते अतुट आहे. राणे कुटुंबियांची नाळ येथील मातीशी जुळलेली आहे. प्रशासनाचा उत्तम अभ्यास असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचा आवाज आहेत. पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. मात्र चेहरा व आवाज नसलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्याच्या विकासाला अधोगती लावली. मोदी लाटेत झालेले दोन्ही पराभव आम्ही विसरलो आहोत. स्वाभिमान पक्षाने केलेली कामे कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवावीत असे आवाहन माजी खासदार तथा महाराष्ट्र स्वाभिमानचे सरचिटणीस निलेश राणे यांनी बांदा येथे केले.

बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ निलेश राणे यांच्या हस्ते रविवारी झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी निलेश राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या कारभारावर जोरदार टीका केली.

निलेश राणे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक ही महत्त्वपूर्ण आहे. राजकारणात हरणा-याला काहीही किंमत नसते. राणेसाहेब कायमच या मातीशी एकनिष्ठ राहिले. जिल्ह्यातील जनतेच्या जोरावर त्यांनी राजकारणातील सर्वच पदे उपभोगली. राजकारणात त्यांना सध्या काहीही कमी नाही. आगामी लोकसभा निवडणूक आम्ही २ लाखांच्या मताधिक्याने जिंकणार असा ठाम विश्चास आहे. सावंतवाडी मतदारसंघातील विरोधक हा धूर्त राजकारणी आहे. त्याला ना चेहरा आहे ना आकार. कपट नीतीने तो काय करेल याचा नेम नाही. असे असूनही संजू परब आणि त्यांच्या टीमचे काम कौतुकास्पद आहे. आमची लढाई ही विकासासाठी आहे. विरोधक हे केवळ राणेद्वेषी आहेत. मात्र आम्ही सर्वांना पुरून उरणार आहोत. कार्यकर्त्यांनी गावागावात पक्षाची सभासद नोंदणी वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना निलेश राणे म्हणाले, राऊत यांना त्यांच्याच गावात किंमत नाही. त्यांच्या घराकडे जायला पक्का रस्ता नाही. जो आपल्या गावचा विकास करू शकत नाही तो मतदारसंघाचा काय विकास करणार. जिल्ह्यातील मच्छिमारांचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. मच्छिमारांचे परतावे अद्याप मिळालेले नाहीत. पालकमंत्री केसरकर यांचा तर प्रशासनावर बिलकूल वचक नाही. त्यांच्याच शहरात नगराध्यक्षांवर हल्ला होतो. जिल्ह्याची सर्वच स्तरावर बिकट अवस्था झालेली आहे. जिल्ह्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी स्वाभिमान पक्षाच्या हाती सत्ता द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

बांद्यातील कार्यकर्त्यांचे निलेश राणेंकडून कौतूक-

बांद्यातील कार्यकर्त्यांचे निलेश राणेंनी कौतूक करताना सांगितले की, स्वाभिमान पक्ष मोठा करण्याचे काम बांदयातील कार्यकर्त्यांनी केले आहे. सर्व जिल्हाभर आम्ही बांद्यातील कार्यकर्त्यांच्या कामाची पध्दत सांगत असतो. बांद्यातील कार्यकर्त्यांमध्ये कधीही मरगळ दिसत नाही. आपापसातील वाद बाजूला ठेऊन एकदिलाने काम करा. केवळ राणेंचा पराभव झाला म्हणजे आम्ही जिंकलो अशी विरोधकांची भावना आहे. ते त्यासाठीच एकत्र येतात. एकत्र येतात म्हणजे ते मित्र आहेत असे नाही असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

अन् तिच्या चेह-यावर हास्य उमटले-

बांद्यातील स्वाभिमानचे कट्टर कार्यकर्ते कासिम गादीवाला यांच्या नातवाच्या डोक्याला गंभीर आजार झाला आहे. त्यांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य नाही. त्यामुळे मुलाच्या आईने याबाबतचे दु:ख निलेश राणे यांच्यासमोरच मांडले. या प्रकाराने निलेश राणेही हळहळले. त्यानंतर निलेश यांनी मुंबईतील लिलावती रुग्णालयात तत्काळ उपचार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. निलेश यांच्या शब्दामुळे त्या मुलाच्या आईच्या चेह-यावर हास्य उमटले.

संजू परब म्हणाले, सत्य हे नेहमी कटू असते. मात्र राजकारणात रिझल्ट महत्त्वाचा असतो. राजकारणात कारणे चालत नाहीत. जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची एकी महत्त्वाची असते. केवळ गर्दी करून काहीही साध्य होत नाही. मडुरा सरपंच निवडणुकीत भाजपा व शिवसेना तालुकाध्यक्ष ठाण मांडून होते. ते संजू परबचा पराभव करण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुकाध्यक्षाचा पराभव करण्यासाठी एक झाले होते. मागील निवडणुकीत आमचा सरपंच केवळ दहा मताने निवडून आला होता. मात्र कार्यकर्त्यांनी एकी दाखवल्यामुळे तब्बल २४१ मतांनी सरपंच निवडून आला. हे कार्यकर्त्यांचे श्रेय आहे.

प्रमोद कामत म्हणाले, राणे कुटुंबच केवळ या जिल्ह्याचा विकास करू शकते. निलेश राणेंच्या खासदारकीच्या कारकिर्दीत करोडो रुपयांचा विकास निधी आला होता. मात्र सध्या परिस्थिती बिकट असून विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. आम्ही पूर्ण केलेल्या विकास कामांची उद्घाटने करण्याचे काम विरोधक करत आहेत.

यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष संजू परब, माजी सभापती प्रमोद कामत, उपसभापती निकिता सावंत, माजी सभापती अंकुश जाधव, बांदा व्यापारी संघ अध्यक्ष प्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर, उपसरपंच अक्रम खान, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, तांबुळी सरपंच अभिलाष देसाई, शेर्ले सरपंच उदय धुरी, गुरुनाथ सावंत, दीपक सावंत, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, महिला शहर अध्यक्ष चित्रा भिसे, शहर अध्यक्ष जावेद खतीब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राणे यांच्या हस्ते सभासद नोंदणी अर्ज वाटप करण्यात आले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *