FB_IMG_1539232910161

शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव बाजुला करून, वैयक्तीक हिमतीवर निवडून येऊन दाखवा: निलेश राणे यांचे खुले आव्हान

कोकण महाराष्ट्र
राजापूर : शिवसेना आणि उध्दव ठाकरे हे केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर आणि भावनिक राजकारण करून निवडणुका जिंकतात.जनेतच्या प्रश्नांचे आणि समस्यांचे त्यांना काहीचं देणे घेणे नाही. इथल्या खासदार आणि आमदाराकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही आणि कार्यक्रमही नाही. शिवसेना आणि बाळासाहेब यांचे नाव बाजुला करून वैयक्तीक हिमतीवर निवडून येऊन दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी दिले.नाटे नगर विद्यामंदिर येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांना निवडून देण्याऐवजी रडणाऱ्या आणि प्रशासनापुढे लोटांगण घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलात. त्यामुळे गेल्या चार वर्षात राजापूर तालुका विकासाच्या बाबतीत मागे पडला आहे. भविष्यात हे बदलण्याची संधी मिळणार असून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सदस्य व्हा, पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आंम्हा तुंम्हाला विकास काय असतो, ते दाखवून देऊ, असा विश्वासही निलेश राणे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.व्यासपीठावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माजळकर, जिल्हा सरचिटणीस मुन्ना खामकर आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, लगतच्या सिंधुदुर्ग जिल्हयातील कणवली–वैभवावडी–देवगड विधानसभा मतदार संघातील आमदार नितेश राणे आपल्या मतदार संघात विकास करू शकतात, तर मग तुमचे आमदार राजन साळवी मागे का? नितेश राणे यांनी पर्यटन, रोजगार, वॉटरस्पोर्ट, फिरते सिनेमागृह, म्युझियम यांसारखी विकासाची कामे करून मतदार संघात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजन साळवींना मात्र मतदार संघातील सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी वेळ नाही. केवळ ठेकेदारी आणि टक्केवारी यातच त्यांचे लक्ष आहे.
सत्ताधाऱ्यांनी किती विकासकामे केली ?
खासदार म्हणून आपण ज्यांना निवडून दिले त्या विनायक राऊतला लोकसभेत धड बोलताही येत नाही अशी अवस्था आहे. लोकसभेत बोलताना ‘गारा पडा’, ‘झपरा नही’ यासारखे शब्दप्रयोग करून मतदार संघाच्या अब्रुची लक्तरे तो वेशीवर टांगत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. आमदार राजन साळवींनी आपल्या आमदारकीच्या दोन टर्ममध्ये आणि खासदार विनायक राऊत याने खासदारकीच्या साडेचार वर्षात किती विकासकामे केली? किती प्रदूषण विरहित कारखाने आणले, किती बेरोजगारांना रोजगार दिले? याचा जाब त्यांना विचारा. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प १०० दिवसात रद्द करू अशी ग्वाही दिली होती, त्याचे काय झाले.प्रकल्प रद्द झाला काय? या प्रकल्पाबाबत आमच्या विरोधात राजकारण करून स्वत:चा राजकिय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न शिवसेनने केल्याचे त्यांनी सांगितले.
नाणार प्रकल्प आलाच कसा ?
आता नाणार रिफायनरी विरोधात लढत असल्याचा आव आणून ते जनतेची सहानुभुती मिळवत आहेत. नाणार प्रकल्प हा केंद्र शासनाने आणला ना? मग दिल्लीत खासदार म्हणून विनायक राऊत काय झोपा काढत होता काय? असा खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला. नाणार होऊ देणार नाही हा आमचा शब्द आहे आणि तो आंम्ही पुर्ण करणारच.पण केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी तुंम्ही, उद्योगमंत्री तुमचा,पर्यावरण मंत्री तुमचा, पालकमंत्री तुमचा आणि तरीही नाणार प्रकल्प आला कसा, याचे जनतेला उत्तर द्या. उगीच मतांसाठी प्रकल्पाचे राजकारण करू नका असा घणाघातही राणे यांनी केला.
शिवसेनेत निष्ठावंताना किंमत नाही
निष्ठावंताना शिवसेनेत स्थान नाही, काल पक्षात आलेला उदय सामंत म्हाडाचा अध्यक्ष होतो, पालकमंत्री मुंबईतुन निवडून आलेला दिला जातो.आणि निष्ठावंत राजन साळवी काय करतोय? त्याची कुवतही नाही.ज्याच्याकडे पैसा त्याला शिवसेनेत पदे आणि निष्ठावंतांच्या हाती धुपाटणे अशी सध्या परिस्थिती आहे. मुंबई महानगर पालिकेवर जगणारी शिवसेना कोकणी जनतेच्या भावनांशी खेळून आपला स्वार्थ साधत आहे याचा विचार कोकणी जनतेने केला पाहिजे. या आमदार खासदारांना विकासाचे काहीच नाही, पण पालकमंत्र्यालाही रत्नागिरी जिल्हयाच्या विकासाचे काहीचं देणं घेणं नाही. ते कोयनेचं पाणी मुंंबईत न्यायला निघालेत. इंथ रस्ते, विज, पाणी, आणि आरोग्याच्या समस्या जैसे थे आहेत आणि हे मुंबईत पाणी नेतायत हा शिवसेनेचा विकास आणि कोकण वासीयांबद्दलची आपुलकी. कुंपणच आता शेत खातंय अशी सध्या परिस्थिती आहे. याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.सन २०१९ च्या निवडणूकीत या सर्वांना घरी बसविण्याची शपथ घ्या. मी कालही तुमच्यासोबत होतो, आजही आहे आणि यापुढे आयुष्यभर तुमच्या सोबत रहाणार आहे अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *