1keralaphoto

केंद्र सरकार कडून केरळ पूरस्थितीला गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून घोषित

देश

केरळमध्ये हाहाकार उडवणाऱ्या पूरस्थितीला आज केंद्र सरकारने गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून घोषित केले. त्या राज्यात पूर आणि पावसाने आतापर्यंत 216 जणांचा बळी घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर त्या राज्यात 5 हजार 645 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. त्या छावण्यांमध्ये 7.24 लाखांहून अधिक विस्थापितांनी आश्रय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 12 ऑगस्टला केरळला भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्या राज्याला 100 कोटी रूपयांची मदत जाहीर केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 ऑगस्टला केरळमधील पूरस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी 500 कोटी रूपयांची मदत जाहीर केली. याशिवाय, पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 2 लाख रूपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
दरम्यान, पूरस्थितीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज केरळ उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका मांडली. एखाद्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची कुठली तरतूद नाही. केरळमधील स्थितीकडे आम्ही गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून पाहतो, असे त्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *