narayan-rane-chiplun

सत्ता द्या, पाच वर्षात रत्नागिरीचा कायापालट करू – खा. नारायण राणे

महाराष्ट्र

आम्ही जसे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे परिवर्तन केले तसे विकासाचे परिवर्तन रत्नागिरीचेही करू
चिपळूण, खेड, गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्याच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश शिंदे

चिपळूण : मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने मुंबईत मराठी माणसासाठी काही केले नाही. तर टक्केवारी आणि परप्रांतीयांशी भागीदारी करून सत्ता मिळवली. त्यामुळे मुंबईत कोकणी माणसाला घर घेणे परवडत नाही. त्यामुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आहे. शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत, जि.प. पंचायत समिती, नगरपालिकेत गेली अनेक वर्षे सत्तेवर आहे. त्यांचेच आमदार, खासदार निवडून येतात. त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा आज पूर्णत: अविकसित राहिला आहे. त्यामुळे शिवसेना सोडा आणि दिलेला शब्द पाळणाऱ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या हातात सत्ता द्या. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात जसे विकासाचे परिवर्तन घडवून आणले आहे, तशा प्रकारचे परिवर्तन येत्या पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात घडवून या जिल्ह्याचा कायापालट करून दाखवतो, असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.
चिपळूण येथील माटे सभागृहात आज सायंकाळी झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नारायण राणे बोलत होते. या मेळाव्यात माजी खासदार निलेश राणे, मंगेश शिंदे, परिमल भोसले, राजन देसाई, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी यांची भाषणे झाली.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या चिपळूण, खेड, गुहागर, दापोली, मंडणगड या पाच तालुक्यांच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश शिंदे यांची निवड केल्याचे पक्षाचे सरचिटणीस, माजी खा. निलेश राणे यांनी जाहीर केले. पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी त्यांचे स्वागत केले. स्वाभिमान पक्षाचे दुसरे जिल्हाध्यक्ष रवी नागरेकर यांच्याकडे रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यांचा कार्यभार राहणार आहे.
खासदार नारायण राणे पुढे म्हणाले की, आज रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या जिल्ह्यात यायला चांगला रस्ता नाही. म्हणून मी रेल्वेने आलो. याचा विचार रत्नागिरीतील जनतेने करायला हवा. या जिल्ह्यातील आज शिकलेली तरूण बेकार आहेत. या जिल्ह्याचा विकास झालेला नाही, औद्योगिकीकरणही झालेला नाही. एखादा केमिकलचा कारखाना आणणे म्हणजे विकास नाही. जनता सुखी-समाधानी नाही. या जिल्ह्याचा विकास झालेला नाही. रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मागे का? आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही जी प्रगती केलेली आहे, जो विकास झालेला आहे त्याचा विचार करण्याची गरज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, नगरपालिका यामध्ये गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. आमदार, खासदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात आज बेकारी वाढलेली आहे. जिल्ह्याचा विकास शून्य झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जनता शिवसेनेलाच निवडून देते, याचा विचार करण्याची गरज आहे.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने मराठी माणसांसाठी, मराठी तरूणांना नोकऱ्या देण्यासाठी काहीही केलेले नाही. आज सगळ्या प्रकारचे उच्चशिक्षण घेऊनही मराठी तरूण बेकार आहे. शिवसेनेमुळे मुंबईतील मराठी माणूस खालसा झाला आहे. मुख्य मुंबईच्या बाहेर दहिसर, वसई या भागात मराठी माणूस राहतो आणि मुंबईला जातो असे सांगून खासदार नारायण राणे पुढे म्हणाले की, मी शिवसेना सोडली याचे कारण साºया जगाला माहिती आहे. मुंबईतील गिरण्या बंद झाल्या. त्या गिरण्यांच्या जमिनी बड्या बिल्डरांना विकल्या गेल्या. त्या बिल्डरांच्या बरोबर शिवसेनेने नेत्यांची पार्टनरशिप आहे. मातोश्री ही पार्टनर आहे. यात शिवसेनेने जी टक्केवारी घेतली आणि त्यामुळेच मराठी माणसाची अधोगती झाली आहे.
खा. नारायण राणे पुढे म्हणाले, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाभिमान पक्षाकडे सत्तेची सर्व पदे आहेत. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पूर्णत: कायापालट केला आहे. सामाजिक, शैक्षणिक विकास केला आहे. मी सुरू केलेल्या महिला भवनमध्ये आज साडेतीनशे महिला काम करीत आहेत. २१ प्रकारची उत्पादने तेथे घेतली जातात. कोकणी फळांवर तिथे प्रक्रिया केली जाते. मी वृद्धाश्रम उभा केला. ५० एकरमध्ये इंजिनियरींग कॉलेज सुरू केले. अखंड देशात अन्यत्र कोठेही नाही असे हॉस्पिटल सिंधुदुर्गात ७० एकरात उभारले आहे. अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज, डेरीकॉलेज मी सिंधुदुर्गात उभारले आहे. अशाप्रकारचे कोणते कार्य रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीने केले? असा सवाल खा. नारायण राणे यांनी केले.
खा. नारायण राणे म्हणाले की, मी जात-पात-धर्म मानत नाही. सर्व जातीधर्माचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. मी ज्यावेळी मंत्री होतो, त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. मी मराठा समाजात जन्म घेतला, राज्यात ३४ टक्के मराठा समाज आहे. त्यात २० टक्के मराठा समाज अत्यंत दारिद्र्यात आहे. त्या गरीब समाजबांधवांसाठी काही करावे यासाठी मी अभ्यास करून अहवाल दिला. त्यामुळे त्या अहवालाच्या आधारे कॉँग्रेस आघाडी सरकारने मराठ्यांना १६ टक्के आरक्षण दिले. मात्र, शिवसेना सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण काढून घेतले. शिवसेनेमध्ये आज अनेक मराठा आमदार, खासदार आहेत. परंतु ते पदाला चिकटले आणि जात विसरले. आज शिवसेना सत्तेत आहे. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांंची भेट मिळत नाही. मी फोन केला की तात्काळ भेट मिळते. मी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामध्ये माझा हेतू मराठा आंदोलनात जे महाराष्ट्रातील मालमत्तांचे नुकसान होत आहे, ते होऊ नये. मराठा तरूणांच्या आत्महत्या थांबाव्यात, मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मी माझ्यासाठी काही मागायला गेलो नाही.
खा. नारायण राणे पुढे म्हणाले की, शिवसेनेला फक्त पैसा कमविणे आणि सत्ता मिळवणे. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता एवढेच माहिती आहे. शिवसेनेने आतापर्यंत दहा ते बारावेळा सत्ता सोडू अशी घोषणा केली. परंतु त्यांनी सत्ता सोडली नाही. सत्तेला चिकटून बसले आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्प रद्द होण्यासाठी शिवसेना सत्ता सोडणार नाही, अशी टीकाही खा. नारायण राणे यांनी केली.

narayan-rane

कोकण उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही, म्हणूनच नाणारला विरोध
खा. नारायण राणे पुढे म्हणाले की, नाणार प्रकल्प कोणी आणला? हा प्रकल्प व्हावा यासाठी शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी करारावर सह्या केल्या. आम्ही ज्यावेळी नाणार प्रकल्पाला विरोध केला, त्यावेळी शिवसेनेला जाग आली. परंतु करारपत्रावर सह्या करताना यांना कोकणी माणसाचे हित दिसले नाही. नाणार पेट्रोकेमिकल प्रकल्पाला आमचा विरोध आहे. याचे कारण कोकण नष्ट करणारा, कोकणला भस्म करणारा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. पेट्रोकेमिकल प्रकल्प आणून येथील फळबागायती आम्हाला उद्ध्वस्त करायची नाही. कोकण उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आमचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे. शिवसेना नेते सत्तेत आहेत. परंतु नाणार प्रकल्प नको असे सांगून सत्तेचा त्याग करीत नाहीत. केवळ सत्ता सोडतो असे म्हणतात, परंतु सत्ता सोडत नाहीत. शिवसेना सत्ता सोडणार नाही, त्यांच्यावर लाथा घातल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत. याचे कारण म्हणजे वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांना सत्ता हवी आहे. त्यातून त्यांना सत्ता मिळवायची आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असा सेनेचा मार्ग आहे.

दिलेला शब्द पूर्ण करण्याची धमक स्वाभिमान पक्षातच आहे
खा. नारायण राणे म्हणाले की, राज्यात आज पाच राजकीय पक्ष आहेत. परंतु या सर्व राजकीय पक्षांनी जनतेला केवळ आश्वासने दिली. त्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे जनतेचा भ्रमनिराश झालेला आहे. परंतु आम्ही स्थापन केलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा कोकणी मराठी माणसाचा पक्ष आहे. दिलेला शब्द पूर्ण करण्याची धमक आमच्यात आहे. राज्यात, मुंबईत, कोकणात कुठेही आम्ही जनतेला दिलेला शब्द फुकट गेला असे कधीच होत नाही, कधीही झालेला नाही.

जीवंत कार्यकर्ते मला हवेत, नुसते भाषण ठोकणारे पुढारी नकोत
स्वाभिमान पक्ष हा दिलेला शब्द पाळणारा, सर्वसामान्यांची दु:खे दूर करणारा, विकासासाठी झटणारा असा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी त्याग, जिद्द आणि सेवाभावी वृत्ती बाळगावी. मला नेता, अगर पुढारी हा शब्द आवडत नाही. मला स्टेजवर बोलणारे पुढारी नकोत तर जनतेत जाऊन जनसेवेसाठी निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत. जनहितासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी निर्भीडपणे रस्त्यावर उतरणारे असे जीवंत कार्यकर्ते मला हवे आहेत, अशी अपेक्षाही खा. राणे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सत्तेवर येण्यासाठी निवडणूक लढविणार
खासदार नारायण राणे म्हणाले की, येत्या २०१९-२०च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते अखंड राज्यात निवडणुकीसाठी उभे राहतील. आम्ही निवडणूक लढविणार आहोत. आम्हाला जनतेची दु:खे दूर करायची आहेत. देशात नोटाबंदी नंतर जी परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे काम महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष करेल, असा विश्वासही खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.

Namkeen

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *