689198-train-mumbai

धक्कादायक ! प्रवाशाने लाथ मारल्याने ट्रॅकमनचा मृत्यू

मुंबई

मुंबईत काम करणाऱ्या ट्रॅकमनला प्रवाशाच्या विकृत मनोवृत्तीमुळे जीव गमवावा लागला आहे. दरवाजात उभ्या असलेल्या एका प्रवाशाने लाथ मारल्याने श्रावण सानप या ट्रॅकमनचा मृत्यू झाला. लोकलने प्रवास करताना दरवाजात उभे राहणे, फलाटावर लोकांना पाहून शिट्ट्या वाजवणे, धावत्या लोकलसोबत नको ते स्टंट करणे असले चाळे अनेक विकृत प्रवासी करताना दिसतात. अशाच एका विकृत प्रवाशामुळे ट्रॅकमनला आपला जीव गमवावा लागला.
श्रावण सानप हे पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी आणि लोअर परळ या स्थानकांदरम्यान आपल्या साथीदारांसोबत ट्रॅकची पाहणी करत होते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने एक लोकल आली. त्यामुळे श्रावण सानप दोन्ही ट्रॅकच्या मधे उभे राहिले. त्याचवेळी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलमधल्या प्रवाशाने सानप यांना लाथ मारली. ही लाथ सानप यांना इतकी जोरात बसली की ते समोरच्या ट्रेनला धडकले. या धडकेत श्रावण सानप गंभीर जखमी झाले. त्यांना नायर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
श्रावण सानप हे कल्याणमध्ये राहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि दोन मुले असे कुटुंब आहे. सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पश्चिम रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सानप यांना लाथ मारणाऱ्या विकृत प्रवाशाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे अशीही माहिती समोर येते आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *