IMG-20180706-WA0017.jpg

सिंधुदुर्गात ४ वर्षात एकही विकास प्रकल्प आणला नाही खासदार नारायण राणे यांचा घणाघात

कोकण

कुडाळ – गेल्या चार वर्षात शिवसेना-भाजप युती सरकारने सिंधुदुर्ग जिल्हय़ात विकासाचा एकही प्रकल्प आणलेला नाही. मी आणलेले सर्व विकासप्रकल्प बंद आहेत. टाळंबा, तिलारीसारखे मोठे पाटबंधारे प्रकल्प मंजूर करून घेतले. त्यांना निधी दिला. तसेच अन्य छोटे पाटबंधारे प्रकल्प गेल्या चार वर्षात निधी नसल्यामुळे बंद आहेत. जिल्हय़ाच्या उर्वरित विकासकामांनाही निधी मिळाला नसल्याचा घणाघात राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी कुडाळ येथे आयोजित स्वाभिमान पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात केला. खा. नारायण राणे यांनी दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार केला. व्यासपीठावर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खा. नारायण राणे पुढे म्हणाले, शिवसेनेचे प्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांची ताकद आता दिसत आहे. मी खासदार झाल्यानंतर संबंधित मंत्र्यांकडे निधी देण्यासाठी पत्र दिलेले आहे. त्यामुळे आता निधी मिळेल, असेही खा. नारायण राणे म्हणाले. १५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा सी-वर्ल्ड प्रकल्प मंजूर करुन घेतला. तो झाला असता तर या जिल्हय़ात वर्षाला ५० लाख पर्यटक आले असते आणि त्याचा फायदा जिल्हय़ाच्या विकासाला झाला असता. साडेचार हजार कोटी रुपये खर्चाचे रेडी बंदर मी मंजूर करुन घेतले. रेडी बंदर पूर्ण झाले असते तर जगातील माल रेडी बंदरात आला असता आणि देशातील माल त्या बंदरातून परदेशात गेला असता.

परंतु, पालकमंत्र्यांनी ते बंद पाडण्याचे काम केले. त्यामुळे शेवटी न्यायालयात जाऊन दाद मागावी लागली. २०१४ साली विमानतळ बांधून पूर्ण झाले असते. परंतु, गेल्या चार वर्षात त्यावर उड्डाण झाले नाही. ओरोसचे आयटी पार्क, दोडामार्गची एमआयडीसी झाली असती तर लाखो तरुणांना रोजगार मिळाला असता. उद्योगधंदे उभे राहिले असते. महामार्ग चौपदरीकरणाचे कामही मंजूर करुन घेतले. आताच्या सरकारने फक्त टेंडर काढण्याचे काम केले. त्यामुळे रस्त्याचे काम सुरु आहे. गेल्या चार वर्षात शिवसेनेच्या नेत्यांनी काय केले. जिल्हा दहा वर्षे मागे नेला आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी मतांचे विचारांचे परिवर्तन घडवून आणले पाहिजे, असे आवाहनही खा. नारायण राणे यांनी केले.

केसरकर आजारी माणसासारखे वागतात
दीपक केसरकर काहीही माहिती न घेता बोलत आहे. तो आजारी माणसासारखा वागतात. तेव्हा त्याने उगाचच बोलू नये. देशात अन्यत्र कुठे नाही असे लाईफटाईम हॉस्पिटल उभारले आहे. जिल्हय़ातील लोकांवर चांगले अत्याधुनिक उपचार व्हावेत. या भावनेनेच हे हॉस्पीटल उभारलेले आहे. माफक दरात अत्याधुनिक उपचार त्या ठिकाणी केले जातात. उद्घाटन झाल्यापासून गेल्या महिन्याभरात हजार, दीड हजार रुग्णांनी त्याचा लाभ घेतला. या हॉस्पिटलची तुलना अन्य कोणत्याही हॉस्पिटलशी होऊ शकत नाही. खासगी रुग्णालयात १२००-१५०० रुपये डायलेसिससाठी घेतले जातात. मात्र, आम्ही ३५० रुपयांत करतो. सर्व मशिन्स जर्मनीच्या असून त्या अत्याधुनिक आहेत. असा इशारा त्यांनी दिला. केसरकर यांनी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी २० कोटी रुपये मंजूर केल्याचे ते सांगतात. परंतु, मी अर्थमंत्र्यांकडे चौकशी केली. त्यावेळी बजेटमध्ये तरतूद नसल्याचे त्यांनी सांगितले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *