2e80651bfb060b532403dfc7206b1acc

मृत पत्नीला कारमध्ये बसवून ‘तो’ मुंबईभर फिरला

मुंबई

मुंबईतील साकीनाका भागात राहणाऱ्या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याच्या दोन आठवड्यांनंतर आणखी एक थरारक गोष्ट उघडकीस आली आहे. संबंधित महिलेचा मृतदेह कारमध्ये ‘बसवून’ तिच्या पतीने बोरीवलीपर्यंत प्रवास केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मनी पुरोहित नामक 26 वर्षीय महिलेने 6 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर तिचा पती सुखराम याने या घटनेची माहिती पोलिसांना न देता तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तो तिचा मृतदेह अॅम्बुलन्सऐवजी नातेवाईकांच्या कारमधून साकीनाक्याहून बोरिवलीपर्यंत घेऊन गेला. तेथे आपल्या ज्ञातीबांधवांच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे त्याचे प्रयत्न होते. मात्र नातेवाईकांनी हा प्रकार पाहिल्यावर त्यांना धक्का बसला. ते हा मृतदेह तातडीने शताब्दी रुग्णालयात घेऊन गेले. एका खासगी वाहनातून मृतावस्थेतील महिलेला रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती देणारा फोन शताब्दी रुग्णालयातून साकीनाका पोलिसांना आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते.
नातेवाईकांच्या जबाबानुसार सुखरामवर कलम 306 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुखरामला 7 जून रोजी अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *