mufti-modi-pti

जम्मू काश्मिरात भाजपने काढला पीडीपी सरकारचा पाठींबा

राजकीय

जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेली अशांतता, वाढता दहशतवाद, तसेच पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या, भाषण स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी, विकास कामांना बसलेली खिळ आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना राज्यकारभार सांभाळण्यात आलेल्या अपयशाचे कारण देत भाजपने जम्मू-काश्मीरमधील पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. हा राजकीय भूकंप घडवून आणल्यानंतर भाजपने काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपने पाठिंबा काढून घेतल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर भाजपचे नेते राम माधव यांनी पत्रकार परिषद घेऊन पीडीपी सरकारमधून भाजप बाहेर पडत असल्याची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी मुफ्ती सरकारवर जोरदार निशाना साधला. मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची चिठ्ठी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना सोपवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्रालय, सर्व यंत्रणांचा सल्ला घेऊन आणि काश्मीरमधील तीन वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेऊनच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही राम माधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील स्थिती खूपच बिघडली होती. काश्मीर अशांत होते. त्यामुळेच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. ज्या किमान समान कार्यक्रमावर युती झाली, तो कार्यक्रम लागू करण्यात मेहबुबा मुफ्ती सरकार अपयशी ठरल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *