623301456

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना बायकोच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, आपल्या नवऱ्याचे वेतन किती आहे, हे जाणून घेण्याचा त्याच्या बायकोला पूर्ण अधिकार आहे. तसेच न्यायालयाने याचिकाकर्त्या सुनीता जैन यांच्या पतीला त्यांना पगाराची ‘पे-स्लिप’ देण्याचे आदेश दिले आहेत.
सुनिता आणि त्यांचे पती पवनकुमार जैन यांचा घटस्फोट झाला असून त्यांना पतीकडून खर्चासाठी महिन्याला केवळ सात हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवावी, अशी मागणी सुनिता यांनी केली होती. माझे पती बीएसएनएलमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांना भरपूर पगार मिळतो, असेही सुनिता यांनी म्हटले होते. मात्र पवनकुमार यांनी आपल्या पगाराची पावती न्यायालयात जमा केल्यानंतर न्यायालयाने सुनिता यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर सुनिता यांनी माहितीच्या अधिकारात पवनकुमार यांच्या पगाराचा तपशिल मागितला. त्याला पवनकुमार यांनी मार्च २०१५ मध्ये उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर आव्हान दिले. त्यावेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
दरम्यान सुनीता यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. तसेच पत्नी म्हणजे कोणी तिसरी व्यक्ती नाही, त्यामुळे तिला यासंदर्भातील माहिती देण्यापासून नकार देऊ शकत नाही. पत्नीला तिच्या पतीचा पगार जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे न्यायालयाने सांगितले आणि सुनीता जैन यांच्या पतीला त्यांना लवकरात लवकर पगाराची ‘पे-स्लिप’ देण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *