mpnipah

गोव्यात आढळला निपाहचा पहिला संशयित रुग्ण

देश

निपाहने केरळमध्ये १३ जणांचा बळी घेतल्यानंतर देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. निपाह या व्हायरसचा मूळ वाहक फ्रुट बॅट्स जातीचं वटवाघूळ असल्याने देशभरात अलर्ट देण्यात आला आहे. मात्र केरळमध्ये निपाह वाढण्यामागे वटवाघुळ नसल्याने या आजाराबात गूढ वाढले आहे. केरळ पाठोपाठ आता गोव्यामध्येही निपाह व्हायरसचा धोका वाढला आहे. केरळमधून गोव्यात दाखल झालेला एक रूग्ण निपाह सदृश्य आढळल्याने त्यांच्यावर गोव्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी संबंधित रूग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. या रूग्णाला निपाहाची लागण झाल्याचे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे भीती अथवा अफवा न पसरवण्याचे सांगण्यात आले आहे.
गोवा मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटलमध्ये या रूग्णावर एका विशेष वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. संबंधित रूग्णाच्या रक्ताचे नमुने नॅशनल इन्सिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.
केरळमध्ये १३ जणांचा निपाह व्हायरसमुळे बळी गेला आहे. तसेच वटवाघुळामुळे निपाह केरळमध्ये पसरला नसल्याने 17 वर्षांपूर्वी भारतात आलेला निपाह व्हायरस पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणूनच देशभरात लोकांनी ‘निपाह’बाबत दक्ष राहणं गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *