234pause_mode_05122010_i_toairfaresslashedhin_34290_6897bpause_mode

विमानाला विलंब झाल्यास मिळणार नुकसानभरपाई

देश

विमान कंपन्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे विमान उड्डाणाला खूपच उशीर झाला आणि एखाद्या प्रवाशानं तिकीट रद्द करायचं ठरवलं, तर यापुढे त्याला तिकिटाचे सगळे पैसे परत देणं कंपनीवर बंधनकारक राहील, अशी तरतूद केंद्र सरकार लवकरच करणार आहे. नागरी विमान वाहतूक खात्याने काही नव्या नियमांचा मसुदा तयार केला असून त्यावर मतं मागवण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.
विमानाचं तिकीट काढल्यानंतर २४ तासांच्या आत ते रद्द केल्यास कुठलंही शुल्क (कॅन्सलेशन चार्ज) द्यावं लागणार नाही. या कालावधीत तिकिटामध्ये अन्य काही बदल करायचा असेल तर तोही कंपनीला मोफत करून द्यावा लागेल, अशी खुशखबर जयंत सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रवास सुरू करायच्या ९६ तास आधी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कुठलाही भुर्दंड सोसावा लागणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
विमान कंपनीच्या चुकीमुळे विमानाला विलंब झाल्यास, त्या कंपनीला प्रवाशांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. विमान उड्डाण दुसऱ्या दिवसापर्यंत रखडल्यास कुठलंही अतिरिक्त शुल्क न घेता प्रवाशांची व्यवस्था हॉटेलमध्ये करणं कंपन्यांना बंधनकारक केलं जाणार आहे.
विमानाला उशीर झाला आणि ‘कनेक्टिंग फ्लाइट’ चुकलं तरी प्रवाशांना कंपनीकडून ठरावीक रक्कम दिली जाईल. विमान खूपच रखडलं आणि प्रवाशानं तिकीट रद्द करायचं ठरवलं, तर त्याला आता पूर्ण पैसे परत मिळू शकतील.
दिव्यांग प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने, लेग स्पेस जास्त असलेली आसनं त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *