meenakshi-thapa_20180585507

अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या प्रकरणी दोषींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा

मनोरंजन

नेपाळी अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्याकांडप्रकरणी दोन्ही दोषींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन या दोघांना दोषी ठरवत तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.अभिनेत्री मीनाक्षी थापा हिची २०१२मध्ये हत्या करण्यात आली होती. अमित जयस्वाल आणि त्याची मैत्रीण प्रीती सुरीन यांनी खंडणीच्या उद्देशाने आधी मीनाक्षीचे अपहरण केले होते आणि त्यानंतर नियोजन करून तिची निर्घूण हत्या केली होती. त्यानंतर मृत शरीराची ओळख पटू नये म्हणून तिचे शीर धडापासून वेगळे करून शीर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकले होते. या दोघांविरोधातील आरोप सिद्ध झाल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जी. शेट्ये यांनी अपहरण, खंडणी आणि हत्या या प्रकरणी मीनाक्षीच्या मारेकऱ्यांना तिहेरी जन्मठेप सुनावली आहे.
बॉलिवूडमध्ये नाम कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगून २६ वर्षीय मीनाक्षी थापा ही नेपाळी तरुणी मुंबईत आली होती. देहरादूनहून मुंबईत येण्याआधी मीनाक्षी डान्स स्कूल आणि स्केटिंग स्कूलमध्ये इंस्ट्रक्टर म्हणून काम करत होती.
मुंबईत आल्यावर तिने फ्रँकफिनमध्येही कोर्स केला होता. आपल्या मेहनतीने तिने ‘सहेर’, ‘४०४’ अशा काही हिंदी सिनेमांत छोटे छोटे रोल्सही मिळवले होते. मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोईन’ या सिनेमाच्या सेटवर मीनाक्षीची ओळख अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन या दोन ज्युनिअर आर्टिस्टशी झाली.पैशांच्या हव्यासापोटी त्या दोघांनी तिचे अपहरण करून तिच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *