mumbai-indians_806x605_51525523727

IPL 2018 – मुंबई समोर आज कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान

क्रीडा

रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या हातातून विजय हिसकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससमोर बुधवारी ८.०० वा. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पुन्हा एकदा कोलकाताचेच आव्हान उभे ठाकले आहे.
दोन्ही संघांचे प्रत्येकी चार सामने शिल्लक असून कोलकाता १० सामन्यांतून ५ तर, मुंबई ४ विजयांसह गुणतालिकेत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी विराजमान आहेत. स्पर्धेत आतापर्यंत मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीर सूर्यकुमार यादवकडून संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा पुढील सामन्यांतही असेल. शिवाय कर्णधार रोहित शर्मा आणि एविन लेविस यांनीदेखील गेल्या सामन्यात बऱ्यापैकी फलंदाजी केली होती. मात्र मुंबईच्या डावाला आपल्या अष्टपैलू खेळाने आकार देण्यात आणि संघाचा समतोल साधण्यात कृणाल व हार्दिक या पंडय़ा बंधूंचे योगदान मोलाचे आहे.
दुसरीकडे मागील लढतीत सुनील नरिनला मध्यक्रमात फलंदाजीला पाठवण्याचा कर्णधार दिनेश कार्तिकचा निर्णय संघाच्या चांगलाच अंगलट आला. त्यामुळे नरिन आणि ख्रिस लिन पुन्हा एकत्र सलामीला येण्याची शक्यता आहे. अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाला गवसलेला फॉर्म ही कोलकातासाठी जमेची बाजू आहे. याशिवाय शुभमन गिल आणि नितीश राणा यांनीसुद्धा मुंबईविरुद्धचा सामना वगळता स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. अष्टपैलू आंद्रे रसेलला संघ फलंदाजीत बढती देऊ शकतो.
दडपणाखाली नेहमी सुरेख खेळ करणारा मुंबईचा संघ यावेळी कोलकात्याला त्यांच्याच भूमीत धूळ चारणार की कोलकाता मागील पराभवाची विजयासह सव्याज परतफेड करणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *