img_20180509091313

कुलीची प्रेरणादायी भरारी,स्टेशनवरील फ्री वायफाय वापरून उत्तीर्ण झाला स्पर्धा परीक्षा

देश

एका कुलीने रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफायचा वापर करुन सिविल सर्विसेज परीक्षेत यश मिळवलं आहे. इंटरनेटचा योग्यवेळी योग्य वापर केल्यास एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. त्याचाच प्रत्यय केरळमधील एर्नाकुलम रेल्वे स्थानकावर दिसून आला. या रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या मोफत वायफायमुळे एका कुलीचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. के श्रीनाथ असे या कुलीचे नाव आहे. तो एर्नाकुलम रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करतो. त्याने केरळ लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. श्रीनाथ जर आयोगाच्या मुलाखतीत उत्तीर्ण झाला तर त्याची भू-राजस्व विभागात ग्राम सहायक पदावर नियुक्ती होऊ शकते.
केरळमधील मुन्नार येथे राहणारा श्रीनाथ मागील पाच वर्षांपासून एर्नाकुलम रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करत आहे. मुन्नारजवळ असणाऱ्या या सर्वांत मोठ्या रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करून तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. आयुष्यातले आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी त्याने रेल्वे स्थानकावरील वायफायचा उपयोग करत अभ्यास करण्यास सुरूवात केली. या अभ्यासामुळेच श्रीनाथ लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला. मुलाखतीतही उत्तीर्ण होण्याचा श्रीनाथला विश्वास आहे.
एर्नाकुलम स्थानकावर २०१६ मध्ये वायफाय सेवा सुरू झाली होती. रेल्वे स्थानकावरील वायफाय सेवेने श्रीनाथला नवे दरवाजे खुले झाले आहेत. यामुळे फक्त अभ्यासच नव्हे तर पुस्तकांवरील माझा खर्च ही वाचल्याचे त्याने सांगितले. श्रीनाथने याशिवाय रेल्वेच्या डी ग्रूपसह अनेक सरकारी नोकरींसाठी अर्ज केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *