kushinagar-bus

धक्कादायक ! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या बसला ट्रेनची धडक,१३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

देश

उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेसाठी बसचालकाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. चालकाच्या कानात इअरफोन होते आणि यामुळेच त्याला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही.
गुरुवारी सकाळी कुशीनगरमधील दुदही येथील रेल्वे क्रॉसिंगवरुन डिव्हाईन इंग्लिश स्कूल या शाळेची बस जात होती. बसमध्ये सुमारे २० विद्यार्थी होते. यादरम्यान रेल्वे क्रॉसिंगजवळ सिवान- गोरखपूर पॅसेंजर ट्रेनही पोहोचली. ट्रेनने दिलेल्या धडकेत बसमधील १३ जणांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बस ट्रेनसोबत जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातात १३ विद्यार्थ्यांसह बसचालकाचाही मृत्यू झाला आहे. सात जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे उत्तर प्रदेशात शोककळा पसरली आहे. पोलीस आणि प्रशासनाने माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. सर्वांना गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *