6221c6a7c656eb54bd5d88dc4e851c62

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ताहिर मर्चंटचा मृत्यू

मुंबई

१९९३ साली घडलेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंट याचा बुधवारी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ताहीरवर मुंबई बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप होता.बॉम्बस्फोटप्रकरणी ताहिर मर्चंट पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. छातीत दुखू लागल्याने पहाटे तीन वाजता त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. ताहिर मर्चंट हा मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी याकूब मेमनचा सर्वात जवळचा साथीदार होता.
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा कोर्टाने ताहिर मर्चंटला फाशीची शिक्षा सुनावली होती. बॉम्बस्फोट घडविण्यासाठी काही लोकांना पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्यांची पाकिस्तानातून ने-आण करण्याची जबाबदारी ताहीरवर होती. या आरोपींचे पासपोर्ट तयार करण्याचे काम ताहीरच करत होता. दुबईत बसून त्याने मुंबई बॉम्बस्फोटाचे षडयंत्र रचले होते. शिवाय शस्त्र खरेदी करण्यासाठी पैसा जमविण्याचे कामही तो करत असल्याचा ठपका न्यायालयाने त्याच्यावर ठेवला होता. त्याच्यावरील हे आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *