raigad

रायगड किल्ल्याचे संवर्धनासाठी राज्य शासनाकडून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार

कोकण

रायगड किल्ल्याचे संवर्धन व विकासाबद्दल पंतप्रधान कार्यालयात सोमवारी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये भारतीय पुरातत्व खात्याच्या मर्यादित क्षमता पाहता रायगड किल्ल्याच्या विकासाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त प्रयत्नांनी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये याबाबतचा सामंजस्य करार लवकरच होणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिली.
रायगडाच्या तटबंदीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात येणार असून, पुरातत्व विभाग या कामावर लक्ष ठेवून असेल. या बैठकीला देशाचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार संभाजीराजे भोसले आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये होणाऱ्या सामंजस्य करारामुळे परवानगीसाठी व निधीसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांचे जतन व संवर्धन जलदगतीने करणे शक्य होणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि विकासासाठी महाराष्ट्र सरकारने ६०६ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. या निर्णयामुळे मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी कामे सुरू होतील असेही ते म्हणाले.
सरकारच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. मात्र, आता हे काम लवकरात लवकर मार्गी लागावं अशी  अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *