nilesh rane

रिफायनरी प्रकल्प रद्द होईपर्यंत लढणार – निलेश राणे

कोकण महाराष्ट्र

nilesh rane

आम्ही प्रत्येक बॉलवर सिक्सरच मारतो, त्यामुळे हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द होई पर्यंत आम्ही लढत राहणार आणि नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प रद्द करणारच, अशी  ठाम ग्वाही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी नाणारवासीयांना दिली.
नाणार ग्रीन रिफायनरी विरोधातील जाहीर सभेत निलेश राणे यांनी शिवसेनेच्या दुटप्पीपणावर खरमरीत टीका केली. ते म्हणाले कोणताही प्रकल्प रद्द करण्याची धमक अंगात लागते, इच्छाशक्ती लागते. ती शिवसेनेकडे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे आहे का? ती असती तर अणुऊर्जा प्रकल्पसुद्धा रद्द झाला असता. तो झाला का? इको सेन्सिटिव्हचे काय झाले. आता हे रिफायनरी बुडवू म्हणताहेत, पण तसे वजन उद्धव ठाकरेंचे सत्तेत आहे का? असे सवाल त्यांनी  उपस्थित केले.शिवसेना इथल्या जनतेला फसवत आहे. इथला  खासदार फसवत आहे. याच शिवसेनेने २०१६ ला याचा रिफायनरीसाठी सौदी अरेबियाशी करार केला आहे. याची माहिती इथल्या खासदार आमदाराला आहे. म्हणूनच तर इथल्या आमदाराने बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाऊन इथल्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणे दर मागितला. आणि त्या नंतर जमिनीचे दलाल इथे फिरू लागले. खरेच शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असेल तर इथला खासदार त्यांच्या अन्य खासदारांना सोबत घेऊन संसदेच्या पायऱ्यांवर का बसत नाही? पंतप्रधानांना अडवून हा प्रकल्प का रद्द करत नाही? इथे येऊन फक्त खोटा विरोध तुमच्यासमोर दाखवतात, या शिवसेनेने तुम्हाला गृहीत धरलेय, तुमची दिशाभूल करण्यासाठी, राणेंनी यामध्ये पडू नये म्हणून खोटी माहिती पसरवतात. पण आता त्यांना भुलू नका. त्यांना त्यांची जागा दाखवा असे निक्षून सांगताना निलेश राणे म्हणाले, आम्ही या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच विरोधात आहोत. म्हणूनच मोजणी स्थगित होण्यासाठी उच्च न्यायालयात जात होतो, मात्र तेव्हा सेनेने अशोक वालम यांना अधिवेशनात प्रकल्प रद्द करतो असे आश्वासन दिले होते. पण यालाही अडीच महिने उलटून गेले, तारखा मिळाल्या पण प्रकल्प रद्द झालेले पत्र मात्र  मिळालेच नाही. आम्ही भूमिका बदलत नाही, जी सुरुवातीची होती तीच शेवट पर्यंत राहणार. तुम्ही नारायण राणे साहेबांवर विश्वास दाखवलात तो कायम ठेवा. एकसंध राहा. मला तुमच्या घरातील सदस्य समजा, हा प्रकल्प रद्द होई पर्यंत आपण लढत राहू असा विश्वास निलेश राणे यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *