ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या हिना सिद्धुने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. हिनाने ६२६.२ गुणांची कमाई करत पहिलं स्थान पटकावलं.महत्त्वाचं म्हणजे हे हिनाचं सलग दुसरं आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक आहे. हिनानं जीतू रायसोबत भारतात आयएसएसएफ वर्ल्डकप फायनलमध्ये १० मीटर एअर पिस्तुल मिश्रित गटात सुवर्ण पदक पटकावलं.
हिनाव्यतिरीक्त भारताच्या दिपक कुमारने १० मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारा गगन नारंग या प्रकारात चौथ्या क्रमांकावर राहिला. तर भारताच्याच रवीकुमारने या प्रकारात पाचवं स्थान पटकावलं.मात्र गगन नारंगने ६२६.२ गुणांची कमाई करत राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वोत्तम गुणांचा विक्रम केला.