speed-camera

मरिन ड्राइव्हवर ‘स्पीडी कॅमेरे’

मुंबई

speed-camera

मरिन ड्राइव्हवर बेफाम वेगाने गाडी चालवणे महागात पडणार आहे. वेगाने धावणाऱ्या गाडय़ांना लगाम घालण्यासाठी मरिन ड्राइव्हवर ‘स्पीडी कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत. वेगाची नशा घेत मरिन ड्राइव्हवर सुसाट गाडी चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मार्गावर वरचेवर अपघातही होत असतात. याला आळा बसावा, यासाठी थेट वाहनांचा वेग टिपणारी यंत्रणा स्पीडी कॅमेऱ्यांच्या निमित्ताने कार्यरत करण्यात आली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर या कॅमेरांची नजर असेल. असे २३ स्पीडी कॅमेरे मरीन ड्राइव्ह परिसरात बसविण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनंतर महापालिकेने एका खासगी संस्थेच्या मदतीने मरिन ड्राइव्हवर हे कॅमेरे बसवले आहेत. याआधी वांद्रे सागरी सेतू, चेंबूर, एक्स्प्रेस वे या ठिकाणी स्पीडी कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र ते कार्यान्वित नव्हते. आता हे सर्व कॅमेरे एकत्र सुरू करण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमुळे गाडी किती वेगाने चालवली गेली, वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या गाडीचे छायाचित्र, गाडीचा क्रमांक थेट कैद होईल. गेल्या पाच महिन्यांत वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्या १६ लाख चालकांवर ई-चलनद्वारे गुन्हे नोंदवले आहेत. तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून आतापर्यंत साडेचार लाख रुपयांचा दंड ई-चलनद्वारे भरण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहसंचालक अमितेश कुमार यांनी दिली. ई-चलनद्वारे दंड भरण्यास वाहनचालक टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्याकडून इतर मार्गाने दंडवसूल करण्याचा विचार सुरू असल्याचे कुमार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *